बर्मिंगहॅम : विश्वचषकाच्या साखळी सामन्यात यजमान इंग्लंडने टीम इंडियाचा 31 धावांनी पराभव केला. या विश्वचषकातला टीम इंडियाचा हा पहिलाच पराभव  ठरला. या पराभवानंतर टीम इंडियाच्या फलंदाजांवर कर्णधार विराट कोहलीने पराभवाचं खापर फोडलं आहे.


इंग्लंडने दिलेल्या 338 धावांचे लक्ष्य पार करताना जर टीम इंडियाचे फलंदाज जर चांगले खेळले असते तर सामन्याचा निकाल वेगळा असता असं वक्तव्य विराट कोहलीने केलं आहे. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता.

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड 360 पर्यंत मजस मारेल असं वाटतं होतं. पण आम्ही त्यांना 338 धावांवर रोखलं. जर फलंदाजांनी चांगला खेळ केला असता तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता असं वक्तव्य विराट कोहलीने केलं आहे. तसेच हार्दिक पंड्या आणि रिषभ पंत मैदानावर असताना आमच्याकडे संधी होती पण एकापठोपाठ विकेट गेल्याने आम्हाला सामन्यात परतणे अवघड झाल्याचंही कोहली म्हणाला.



दरम्यान बर्मिंगहॅमच्या लढाईत इंग्लंडनं टीम इंडियाचा विश्वचषकातला विजयरथ रोखल्यानंतर इंग्लंडच्या विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा अजूनही शाबूत आहेत. या सामन्यात इंग्लंडनं दिलेल्या ३३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला 50 षटकांत पाच बाद 306 धावांचीच मजल मारता आली. रोहित शर्मानं झळकावलेलं शतक भारताच्या डावाचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं. त्यानं विराट कोहलीच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी रचून भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. पण ती जोडी फुटली आणि टीम इंडिया विजयापासून दूर राहिली.

या विजयानंतर  इंग्लंडच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम राहिल्या आहेत. मात्र दुसरीकडे भारताच्या विजयासाठी प्रार्थना करणाऱ्या पाकिस्तानचा प्रवास मात्र आता खडतर झाला आहे. भारताच्या पराभवामुळे पाकिस्तानच्या गोटात चिंतेच वातावरण पसरलं आहे. उपांत्य फेरीत दाखल होण्यासाठी पाकिस्तानला बांगलादेशविरुद्ध विजयासोबत इतर संघाच्या कामगिरीवरही अवलंबून रहावं लागणार आहे.