world cup 2019 : विराट कोहलीच्या टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 227 धावांत रोखून विश्वचषक सामन्यावर वर्चस्व मिळवलं आहे. या सामन्यात आता भारतासमोर विजयासाठी 228 धावांचं आव्हान आहे. भारताकडून यजुवेंद्र चहलने चार, जसप्रीत बुमराने आणि भुवनेश्वरने प्रत्येकी दोन, तर कुलदीप यादवने एक विकेट काढली.

नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. बुमराहने चौथ्या आणि सहाव्या षटकात दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीरांना तंबूत पाठवलं. सहाव्या षटकाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेची स्थिती दोन बाद 24 अशी झाली होती. कर्णधार फाफ डू प्लेसिसने डुसेनच्या जोडीने 54 धावांची भागिदारी रचली होती, मात्र चहलने दक्षिण आफ्रिकेचं डाव सावरण्याचं स्वप्न भंग केलं. चहलने एकाच षटकात दोघा फलंदाजांना माघारी धाडलं.

साऊदम्पटनमधल्या रोज बाऊल स्टेडियमवर टीम इंडियाचा सलामीचा सामना रंगत आहे. दक्षिण आफ्रिकेचा यंदाच्या विश्वचषकातला हा तिसरा सामना आहे. याआधी इंग्लंड आणि बांगलादेशकडून दक्षिण आफ्रिकेला पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे विजयाचं खातं उघडण्यासाठी दक्षिण आफ्रिकेची फौजही उत्सुक असेल.