मुंबई: भारतीय हॉकी टीमची कर्णधार रितू राणी आपल्या खराब कामगिरी आणि गैरवर्तनामुळे सातत्याने सांगण्यात येत होते. पण रिओ ऑलम्पिकसाठी टीमची घोषणा होण्यापूर्वीच ती टीम शिबीरातून बाहेर पडली आहे.
16 खेळाडूंच्या अंतिम यादी येत्या तीन दिवसात तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या बंगळुरूमध्ये राष्ट्रीय शिबीर सुरु आहे. पण या शिबीरातून मधूनच तिने काढता पाय घेतल्याचे टीम प्रबंधनच्या वरिष्ठ सदस्यांनी सांगितले.
तीन दिवसांपासून बंगळुरूमध्ये रिओ ऑलम्पिकसाठी राष्ट्रीय शिबीर सुरु आहे. या शिबीरादरम्यान रितूला तिच्या खराब प्रदर्शानाला सुधारण्यासंबंधी वारंवार सांगण्यात आले होते. पण तरीही ती त्याच्यात कोणतीही सुधारणा करु शकली नाही. हे शिबीर संपल्यानंतर भारतीय महिला हॉकी संघ रिओ ऑलम्पिकसाठी रवाना होणार होता. पण तत्पूर्वीच रितू हे शिबीर अर्ध्यावरच सोडून निघून गेली असल्याचे या सदस्याने सांगितले.
भारतीय महिला हॉकी संघ 1980 नंतर 36 वर्षांनी ऑलम्पिकसाठी पात्र ठरला आहे. 24 वर्षीय रितू गेल्या एक दशकापासून भारतीय महिला संघाचे नेतृत्व करत आहे. हॉकीमधील मिडफील्डची ती एक महत्त्वाची खेळाडू आहे.
दरम्यान, रितूच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व राणी रामपाल हीला देण्यात येऊ शकते. तर दुसरीकडे हॉकी संघाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनीही या मुद्द्यावरून प्रतिक्रीया देण्यास नकार दिला असला तरी खेळाडूंचे हे वर्तन अपरिपक्व असल्याचे म्हटले आहे.
बत्रांनी दिलेल्या प्रतिक्रीयेनुसार, ''रितुचे हे वर्तन अपरिपक्वपणाचे आहे. वास्तविक, ऑलम्पिकसाठी भारतीय हॉकी संघाची घोषणा 12 जुलै रोजी करण्यात येणार आहे. तत्पूर्वी 11 जुलै रोजी हॉकी इंडियाच्या कार्यकारी बोर्डाच्या बैठकीत संघाचा कर्णधार आणि उपकर्णधारावर चर्चा होऊनच निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, तत्पुर्वीच एखाद्या खेळाडूने टीम शिबीरातून बाहेर जाणे चुकीचे आहे.''