रिओ दी जिनेरिओ: दक्षिण अफ्रिका क्रिकेट संघाकडून एक कसोटी आणि 17 एकदिवसीय सामने खेळलेल्या सुनेट विलजोनने रिओ ऑलिम्पिकच्या महिला भाला फेक स्पर्धेत रौप्य पदक पटकावून इतिहास रचला आहे.

 

विलजोनने 64.92 मीटर अंतर भाला फेकून दुसरे स्थान प्राप्त केले. तर क्रोएशियाची सारा कोलाक हिने 66.18 मीटर लांब भाला फेकून पहिले स्थान पटकावले. चेक प्रजासत्ताकच्या बारबोर स्पोटकोवाने 64.80 मीटर लांब भाला फेकून कांस्य पदक जिंकले.

 

भारत विरोधात 2002मध्ये पार्लमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात 33वर्षीय विलजोन सहभागी होती. तसेच 2012मध्ये लंडनमधील ऑलिम्पिक स्पर्धेतही तिने उत्कृष्ट कामगिरी केली होती. मात्र, तिला या स्पर्धेत चौथ्या स्थानावरच समाधान मानावे लागले होते.

 

विलजोनने ज्या एकमेव कसोटी सामन्यात सहभाग होता, त्या सामन्यातील पहिल्या खेळीत तिने 88 धावा, तर दुसऱ्या खेळीत 71 धावा केल्या होत्या. याशिवाय तिने 17 एकदिवसीय सामन्यांमधून 198 धावा केल्या, त्यात एका अर्धशतकाचाही समावेश आहे. तसेच तिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना, पाच गडी बाद केले होते.