मुंबई : उद्योजक विजय मल्ल्यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण सीबीआयपाठोपाठ अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने मल्ल्यांच्या सहा हजार कोटींच्या संपत्तीवर टाच आणण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

 

ईडीने सीबीआयकडून मल्ल्यांविरोधात 6027 कोटी रुपयांच्या प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्राची मागणी केली आहे. सीबीआयच्या या आरोपपत्राच्या आधारावर ईडी नवा खटला दाखल करणार आहे.

 

स्टेट बँकेच्या तक्रारीनंतर विजय मल्ल्यांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. 17 हून अधिक बँकांचं कोट्यवधी रुपयांचं कर्ज बुडवणाऱ्या विजय मल्ल्यांना विशेष न्यायालयाने फरार घोषित केलं आहे. विजय मल्ल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी झालं आहे. मल्ल्या सध्या लंडनमध्ये आहेत.

 

याआधी आयडीबीआय बँकेच्या प्रकरणात ईडीने जून 2016 मध्ये विजय मल्ल्यांची 1411 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. यामध्ये मुंबई आणि बंगळुरुमधील फ्लॅट आणि चेन्नईतील एका प्लॉटचा समावेश होता. दरम्यान, मल्ल्यांच्या फ्रान्समधील चार बँक खात्यांबाबतची माहिती समोर आली आहे.