डर्बी : मिताली राजचा भारतीय संघ महिला विश्वचषकाची फायनल गाठणार का, या प्रश्नाचं उत्तर आज डर्बीच्या मैदानात मिळेल. महिला विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात आज भारताचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
ऑस्ट्रेलियाची वन डे क्रिकेटमधली कामगिरी लक्षात घेता हा सामना दोन असमान ताकदीच्या संघांमधला मुकाबला मानला जात आहे.
आजवरच्या दहा महिला विश्वचषकांमध्ये ऑस्ट्रेलियाने सहावेळा विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. तसंच वन डे सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने भारतावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. उभय संघांमधल्या 42पैकी 34 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियानं विजय मिळवला असून, भारताला केवळ आठ सामने जिंकता आले आहेत.
या पार्श्वभूमीवर विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचं पारडं जड मानलं जात आहे. पण ऑस्ट्रेलियावर बाजी उलटवण्याची ताकद मिताली राजच्या भारतीय संघात नक्कीच आहे. भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलियात पराभूत केलं तर तब्बल 12 वर्षांनंतर भारतीय संघ विश्वचषकाची अंतिम फेरी गाठेल.