मुंबई: आता तुमचं आधार कार्ड तुम्हाला थेट स्मार्टफोनमध्येच पाहायला मिळणार आहे. कारण की, UIDAI ने mAadhaar हे मोबाइल अॅप काल (बुधवारी) लाँच केलं आहे.


mAadhaar या अॅपसाठी यूजर्सला आपला मोबाइल नंबर UIDAIवर रजिस्टर करणं गरजेचं आहे. या अॅपमध्ये आपलं नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता आणि फोटो देखील असणार आहे. या अॅपमुळे आता प्रत्येकवेळी तुम्हाला आधार कार्डची हार्ड कॉपी सगळीकडे घेऊन जाण्याची गरज पडणार नाही. या अॅपमुळे आपल्या स्मार्टफोनमध्येच आधार कार्ड अॅक्सेस करता येणार आहे.

हे अॅप सध्या अँड्रॉईड यूजर्संसाठी लाँच करण्यात आलं आहे. गुगल प्ले स्टोअरवरुन अॅप डाऊनलोड करता येईल. लवकरच iOS यूजर्ससाठी देखील अॅप लाँच करण्यात येणार आहे. या अॅपच्या फीचर्सचा विचार केल्यास यामध्ये यूजर आपला बायोमॅट्रिक डेटा आपल्या इच्छेनुसार लॉक आणि अनलॉक करु शकतात.


त्यामुळे हे अॅप लाँच करुन सरकारनं डिजिटायजेशन दृष्टीनं आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे.  दरम्यान, 1 जुलैपासून करदात्यांना आपला आधार नंबर पॅनकार्डशी लिंक करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.