मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी मागवलेल्या अर्जातून बीसीसीआयने तीन प्रशिक्षकांची नाव निश्चित केली केली आहेत. त्यात दक्षिण आफ्रिकेचे गॅरी कर्स्टन, हर्षल गिब्ज आणि भारताचा माजी ऑफ स्पिनर रमेश पोवार यांची निवड करण्यात आली आहे.


मुलाखतीनंतर तिघांपैकी एकाची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी वर्णी लागेल. नुकत्याच झालेल्या आयसीसीच्या महिला ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात रमेश पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघानं उपांत्य फेरी गाठली होती. त्यामुळे रमेश पोवार यांची पुन्हा प्रशिक्षकपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून पहिल्या टर्ममध्ये वादग्रस्त ठरलेल्या रमेश पोवार यांनी त्या पदासाठी पुन्हा अर्ज केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना या प्रमुख खेळाडूंना दिलेल्या पाठिंब्यामुळेच आपण भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी पुन्हा अर्ज केल्याचं पोवार यांनी सांगितलं.

वेस्ट इंडिजमधल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत अनुभवी मिताली राजला भारतीय संघातून वगळण्याचा संघ व्यवस्थापनाचा निर्णय वादग्रस्त ठरला होता. सदर सामन्यात भारताला इंग्लंडकडून हार स्वीकाराली लागली. त्यामुळे त्या निर्णयाचं खापर पोवारवर फुटलं होतं.