पिंपरी चिंचवड : कर्जबाजारीपणाला कंटाळून पिंपरी-चिंचवडमधील एक कुटुंब सुसाईड नोट लिहून बेपत्ता झालं आहे. संतोष शिंदे, सविता शिंदे (पती), मुकुंद शिंदे (मुलगा) आणि मैथिली शिंदे (मुलगी) अशी बेपत्ता असलेल्यांची नावे आहे. शिंदे कुटुंबीय चिंचवडच्या मोहननगरमधील रहिवासी आहेत.


संतोष शिंदे यांचा पिंपरीमध्ये ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी त्यांनी बँकांकडून कोट्यवधींचं कर्ज घेतलं होतं. या कर्जाचे हप्ते गेल्या काही महिन्यांपासून भरणे त्यांना शक्य होत नव्हतं. या कर्जवसुलीसाठी बँकांनी संतोष यांच्याकडे तगादा लावला होता. बँकेने मालमत्ता जप्तीची नोटीसही त्यांना दिली होती.


बँकेची कारवाई टाळण्यासाठीच शिंदे कुटुंबीय सुसाईड नोट लिहून बेपत्ता झालं आहे, अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली आहे.


"कर्जबाजारीपणाला मी एकटाच जबाबदार असल्याने अन्य कोणाला दोषी धरु नये. मी स्वतःच घर सोडून निघून चाललो आहे. आम्ही चौघेही आत्महत्या करणार आहोत, हा सर्वस्वी आमचा निर्णय आहे," असं सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. 5 डिसेंबरपासून शिंदे कुटुंबीय बेपत्ता आहे.


संतोष यांच्या भावाने 6 डिसेंबरला पोलिसांना याबाबत माहिती दिली. संतोष शिंदे फोन का उचलत नाहीत, म्हणून त्यांच्या भावाने घराची झडती घेतली. त्यावेळी चौघांचे मोबाईल आणि सुसाईड नोट घरात सापडली, त्यानंतर हा प्रकार समोर आला. माहिती मिळाल्यानंतर पोलीस शिंदे कुटुंबियांचा शोध घेत आहेत.