मुंबई : भारताने नॉटिंगहॅम कसोटीत इंग्लंडवर मात केल्यानंतर आता लक्ष लागलं आहे ते साउदम्प्टन कसोटीकडे. मालिकेत 0-2 ने पिछाडीवर पडल्यानंतर टीम इंडियाने दमदार पुनरागमन केलं. यानंतर भारतीय संघाचं लक्ष आता ऐतिहासिक विजयाकडे लागलं आहे.


साउदम्प्टनच्या चौथ्या कसोटीसाठी विराटच्या भारतीय संघात मुंबईच्या एका युवा फलंदाजाचा समावेश करण्यात आला आहे. त्याचं नाव आहे पृथ्वी शॉ.

पृथ्वीने गेल्या दीड वर्षात 14 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 56.72 च्या सरासरीने 1418 धावांचा रतीब घातला आहे. त्यात सात शतकं आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. अ दर्जाच्या क्रिकेटमध्येही त्याच्या नावावर 19 सामन्यांत 651 धावा जमा आहेत. पृथ्वीच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर-19 विश्वचषकावरही यंदा आपलं नाव कोरलं. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात पृथ्वी थोरामोठ्यांच्या खांद्याला खांदा भिडवून खेळला.

पृथ्वी शॉच्या बॅटमधून वाहणारा धावांचा रतीब पाहता तो लवकरच भारतीय संघातून खेळेल अशी अपेक्षा होती. सुनील गावसकरांनीही टीम इंडियाच्या पहिल्या दोन कसोटीतल्या पराभवानंतर पृथ्वी शॉची आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड करण्याबाबत विधान केलं होतं. बीसीसीआयच्या निवड समितीने त्याआधीच मुरली विजयऐवजी पृथ्वी शॉचा भारताच्या कसोटी संघात समावेश केला. आता प्रश्न हा आहे की, पृथ्वी शॉ साउदप्म्पटन कसोटीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार का?

टीम इंडियाने नॉटिंगहॅम कसोटीत 203 धावांनी दणदणीत विजय मिळवला. आजवरचा इतिहास लक्षात घेता विनिंग कॉम्बिनेशन सहसा बदललं जात नाही. पृथ्वी शॉला चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात घ्यायचंच झालं तर तो कोणाच्या जागी खेळणार? असा प्रश्न आहे.

नॉटिंगहॅम कसोटीत शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी मोठी खेळी केलेली नसली तरी त्यांनी दोन्ही डावात भारताला चांगली सलामी दिली. त्यामुळे सलामीचा फलंदाज असलेल्या पृथ्वी शॉला साउदम्प्टन कसोटीत संधी मिळणार का याबाबत शंकाच आहे.

चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या मधल्या फळीतल्या फलंदाजांनीही तिसऱ्या कसोटीत धावांचा रतीब घातला होता. त्यामुळे चौथ्या कसोटीसाठी विनिंग कॉम्बिनेशनमध्ये बदल होण्याची शक्यता नाही. या परिस्थितीत पृथ्वीला साउदम्प्टन कसोटीत ड्रेसिंगरुमचाच अनुभव मिळण्याची अधिक चिन्हं आहेत. पृथ्वीचं जेमतेम 18-19 वर्षांचं वय लक्षात घेता त्याच्या दृष्टीने टीम इंडियाची ड्रेसिंगरुम शेअर करण्याची संधी मिळणं मोलाचं ठरु शकतं.

संबंधित बातम्या :

चौथ्या कसोटीपूर्वी पृथ्वी शॉचा कसून सराव

मुरली विजयला डच्चू, पृथ्वी शॉ भारतीय संघात!