बंगळुरु: टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेनं आज कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या आक्रमकतेवर सूचक भाष्य केलं. 'प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते.' असं म्हणत कुंबळेनं याविषयी आपलं मत व्यक्त केलं.
'विराट कोहलीची मैदानावरील आक्रमकता नियंत्रित करणारी आपण शेवटची व्यक्ती असणार आहोत. मात्र, भारताचं प्रतिनिधित्व करताना खेळाडूंनी या गोष्टीचं भान राखायलं हवं की, प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते.' असं मत कुंबळेनं व्यक्त केलं.
वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणाऱ्यापूर्वी कुंबळेनं पत्रकार परिषदेत विराटच्या आक्रमकतेवरच्या प्रश्नावर बोलताना सांगितलं की,'मला त्याची आक्रमकता आवडते. मी देखील यापेक्षा वेगळा नव्हतो. मी देखील खूप आक्रमक होतो. पण आमचा मार्ग बहुतेक वेगळा होता. तुम्ही तुमची आक्रमकता नियंत्रित करु इच्छित नाही. त्यामुळेच त्याच्या आक्रमकतेला आपण मुरड घालणार नाही.'
पण याच वेळी बोलताना कुंबळेने सर्व आक्रमक खेळाडूना इशाराच दिला आहे. 'आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की, भारताचं प्रतिनिधित्व करणं आणि भारतीय क्रिकेट संघाचं भाग होणं ही फारच महत्वाची गोष्ट आहे. हे सगळेच जाणून आहे. त्यामुळेच आपली मर्यादा सगळ्यानाच माहिती आहे. पण मी कोणाच्याही नैसर्गिक स्वभावाला मुरड घालणार नाही.'
'कायम जिकंणं हेच आपलं लक्ष्य असलं पाहिजे. जेवढे सामने जिंकता येतील तेवढे सामने जिंकायला हवे. कोणत्याही सामन्यात नकारात्मक विचार घेऊन खेळता कामा नये.' असंही कुंबळे म्हणाला.