आयपीएलच्या झगमगाटापासून मुंबई इंडियन्सनं गेली चार वर्षे दूर ठेवलेला मुंबईचा गुणी फलंदाज म्हणजे सिद्धेश लाड.
फलंदाजांची खाण अशी ओळख लाभलेल्या मुंबईची उदयोन्मुख गुणवत्ता कोण या प्रश्नाचं उत्तर आहे सिद्धेश लाड.
राष्ट्रीय क्रिकेटमध्ये यंदाच्या मोसमात मुंबईसाठी धावांचा रतीब घालणारा फलंदाज कोण असेल, तर तो आहे सिद्धेश लाड.
तुम्हीच पाहा, सिद्धेश लाडनं यंदाच्या मोसमातल्य़ा रणजी करंडकात तब्बल 652 धावांचा रतीब घातला आहे. सात सामन्यांमधल्या बारा डावांत त्यानं 59.27च्या स्ट्राईक रेटनं धावांचा हा डोंगर उभारला. त्यात दोन शतकं आणि तीन अर्धशतकांचा समावेश होता.
ही झाली सिद्धेशची क्रिकेटच्या लॉन्गर फॉरमॅटमधली कामगिरी. आता पाहूयात त्यानं मुंबईकडून ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये कशी कामगिरी बजावली आहे?
ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी ट्वेन्टी स्पर्धेतही यंदा सिद्धेश लाडनंच मुंबईकडून सर्वाधिक धावांचा डोलारा उभारला. त्यानं आठ सामन्यांत 138.26 च्या स्ट्राईक रेटनं 271 धावा फटकावल्या होत्या. त्यात दोन अर्धशतकांचा समावेश होता.
सिद्धेश लाड गेली पाच वर्षे राष्ट्रीय क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करत आहे. या कालावधीत त्यानं 39 सामन्यांमध्ये 43.23च्या सरासरीनं 2767 धावा फटकावल्या आहेत. त्यात सहा शतकं आणि सोळा अर्धशतकांचाही समावेश आहे. एक बदली ऑफ स्पिनर या नात्यानं प्रथम दर्जाच्या 39 सामन्यांमध्ये त्याच्या नावावर केवळ चारच विकेट्स आहेत, पण त्यानं तब्बल 108 षटकं टाकली आहेत. याचा अर्थ प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये मुंबईच्या कर्णधाराला सिद्धेश लाडचा गोलंदाज म्हणूनही वापर करावासा वाटतो. पण हाच सिद्धेश लाड आयपीएलच्या महायुद्धासाठी मुंबई इंडियन्सच्या फौजेत सामील होतो, त्या वेळी त्याच्या वाट्याला येते ती मात्र निव्वळ उपेक्षा.
मुंबईचा हा गुणी फलंदाज आयपीएलच्या गेल्या तीन मोसमांत आणि त्यानंतर यंदाही मुंबई इंडियन्सचं केवळ डगआऊट उबवतो आहे. मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराला म्हणजे रोहित शर्माला सिद्धेश लाडच्या गुणवत्तेची कल्पना नाही असं म्हणायचं, तर तसंही नाही. कारण रोहित शर्मा हाही मूळचा मुंबईचाच फलंदाज आहेत. त्यात दोघंही बोरिवलीच्या स्वामी विवेकानंद हायस्कूल या शाळेचीच देणगी आहेत.
सिद्धेश लाड आज पंचवीस वर्षांचा आहे. येत्या २३ मे रोजी तो वयाच्या सव्वीसाव्या वर्षात पदार्पण करेल. सिद्धेश लाड मुंबई इंडियन्सच्या फौजेत पहिल्यांदा सामील झाला तो 2015 साली. सलग तीन मोसमांत मुंबई इंडियन्सनं त्याला कधीच खेळवलं नाही. पण यंदाचा राष्ट्रीय मोसम आपल्या फलंदाजीनं गाजवूनही मुंबई इंडियन्सची त्याच्याकडची डोळेझाक कायम आहे.
सिद्धेश लाडसारखाच मुंबईचा कर्णधार आणि यष्टिरक्षक आदित्य तरेही यंदाच्या मोसमात डगआऊटमध्येच बसून आहे. त्याची जागा घेणाऱ्या ईशान किशनची कामगिरी काय, तर आठ सामन्यांमध्ये फक्त १५१ धावा. त्याही वरच्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळून.
मुंबई इंडियन्स ही फ्रँचाईझी नीता अंबानी यांची खाजगी मालमत्ता आहे. त्यामुळं कुणाला विकत घ्यायचं आणि कुणाला खेळवायचं हा त्यांचा आणि त्यांच्या व्यवस्थापनाचा प्रश्न आहे. पण मुंबईचं नाव लावायचं आणि मुंबईच्या रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या दोनच, पण गुजरातच्या हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या आणि जसप्रीत बुमरा या तीन शिलेदारांना हक्कानं खेळवायचं हे समीकरण काही मुंबईकरांच्या मनाला पटणारं नाही.
अंबानींच्या मुंबई इंडियन्समध्ये गुजरातच्या हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या आणि जसप्रीत बुमराला यांना पूर्ण अभय आहे. त्यांचा परफॉर्मन्स चांगला होवो वा वाईट, त्या तिघांच्या स्थानाला यंदा अजूनही धक्का लागलेला नाही. हाच भेदाभेद मुंबई इंडियन्सच्या मुळावर आला आहे. अंबानींच्या या फ्रँचाईझीला यंदाच्या मोसमात पहिल्या आठपैकी सहा सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. आता इथून प्ले ऑफमध्ये धडक मारायची, तर अंबानीच्या मुंबई इंडियन्सला नेहमीप्रमाणे केवळ चमत्कारच वाचवू शकेल.
मुंबईचा सिद्धेश लाड ‘मुंबई इंडियन्स’ला नकोसा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 May 2018 08:15 PM (IST)
मुंबई इंडियन्स फ्रँचाईझीला मूळच्या मुंबईच्या शिलेदारांची अॅलर्जी आहे का? आम्हाला हा प्रश्न पडण्याचं कारण मुंबई इंडियन्स एकामागोमाग एक असे सामने हरत असताना त्यांचा इन फॉर्म फलंदाज सिद्धेश लाड हा डगआऊटमध्येच बसून आहे. मुंबई इंडियन्सनं सिद्धेशला गेल्या तीन मोसमांमध्ये एकदाही खेळवलेलं नाही. पण त्याच सिद्धेश लाडनं यंदाच्या राष्ट्रीय क्रिकेटमध्ये दाखवलेला फॉर्म लक्षात घेता त्याला यावर्षी तरी संधी मिळणं आवश्यक होतं. पण आयपीएलच्या अकराव्या मोसमातून मुंबई इंडियन्सनं गाशा गुंडाळण्याची वेळ आली, तरी सिद्धेश लाडला काही संधी मिळालेली नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -