S. Sreesanth on Harbhajan Singh: आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त प्रकरण, 2008 चे 'स्लॅपगेट' प्रकरण, पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यावेळी याचे कारण आहे भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत, ज्याने हरभजन सिंगवर गंभीर आरोप केले आहेत. 80 लाख ते 4 कोटी रुपये कमावले. श्रीशांतने दावा केला आहे की, हरभजनने त्याच 'स्लॅपगेट' प्रकरणावर आधारित एका टीव्ही जाहिरातीतून 80 लाख ते 4 कोटी रुपये कमावले आहेत. इतकेच नाही, तर त्याने असेही म्हटले आहे की, भज्जीने त्याला ती जाहिरात त्याच्या सोशल मीडियावर प्रसारित करण्यास सांगितले होते, जे त्याला अजिबात आवडले नाही. एका मुलाखतीत श्रीशांतने या विषयावर पहिल्यांदाच उघडपणे भाष्य केले, तो म्हणाला, "मी त्याला नेहमीच माफ केले, पण मी कधीच विसरलो नाही. जर तुम्ही विसरलात, तर दुसरी व्यक्ती तीच चूक पुन्हा करते."

'स्लॅपगेट' प्रकरण काय होते?

ही घटना 2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामात घडली होती, जेव्हा मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यातील सामन्यानंतर हरभजन सिंगने श्रीशांतला कानशिलात लगावली होती. या घटनेनंतर श्रीशांत मैदानावर रडताना दिसला. प्रकरण चिघळले आणि हरभजन सिंगवर संपूर्ण हंगामासाठी बंदी घालण्यात आली, तसेच त्याचे मॅच फी सुद्धा कापण्यात आली. हा आयपीएलमधील पहिला मोठा वाद ठरला, ज्यामुळे स्पर्धेच्या प्रतिमेवरही परिणाम झाला.

आता नात्यात दुरावा, भज्जीला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केले

श्रीशांतने स्पष्टपणे सांगितले की, हरभजन सिंगसोबत त्याचे आता कोणतेही नाते राहिलेले नाही. "मी त्याला भाऊ मानत असे, पण आता मी त्याला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केलं आहे." त्याने असाही आरोप केला की, हरभजनची सार्वजनिक प्रतिमा आणि त्याचे वास्तविक वर्तन यात फरक आहे. त्याच्या मते, टीव्ही मुलाखतींमध्ये आणि सार्वजनिक व्यासपीठांवर दाखवलेली मैत्री "केवळ एक नाटक" आहे.

जुन्या व्हिडिओमुळे वादाला आणखी हवा

जेव्हा आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी अलीकडेच या घटनेचा एक हाय-डेफिनिशन व्हिडिओ प्रसिद्ध केला, तेव्हा या वादाला आणखी हवा मिळाली. जवळपास दोन दशकांनंतर समोर आलेल्या या फुटेजमुळे हा वाद पुन्हा पेटला आहे. जरी हरभजन सिंगने आपली चूक आधीच मान्य केली असली आणि खेद व्यक्त केला असला तरी, श्रीशांतला वाटते की, जेव्हा त्याच घटनेतून आर्थिक फायदा घेतला जातो, तेव्हा माफी मागण्याला काही अर्थ नाही.

इतर महत्वाच्या बातम्या