सेन्चुरियन : विराट कोहलीच्या टीम इंडियानं पाचवी वन डे जिंकून दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पहिल्यांदाच मालिका जिंकण्याचा इतिहास घडवला. याच पार्श्वभूमीवर भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ आज सहाव्या वन डे सामन्यासाठी आमनेसामने येणार आहेत.

हा सामना सेन्चुरियनच्या सुपरस्पोर्टस पार्कवर खेळवण्यात येईल. भारतानं पाचवी वन डे जिंकून, मालिकेत ४-१ अशी आधीच खिशात घातली आहे. त्यामुळं टीम इंडियानं आयसीसीच्या वन डे क्रमवारीत नंबर वनवर झेप घेतली. या नंबर वनचा लौकिक राखण्यासाठी आणि मालिकेवरचं आपलं वर्चस्व पुन्हा दाखवून देण्यासाठी टीम इंडिया सहावी वन डेही जिंकण्याचा नेटानं प्रयत्न करेल.

या सामन्याच्या निमित्तानं भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराला विश्रांती देऊन, टीम इंडिया मोहम्मद शमी आणि शार्दूल ठाकूरला खेळवणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

या संपूर्ण मालिकेत टीम इंडियांच्या पहिल्या तीन फलंदाजांनी सुरुवात चांगली करुन दिली असली तरी मधल्या फळीतल्या फलंदाजांना म्हणावा तसा सूर अद्यापही सापडलेला नाही. अंजिक्य रहाणे, हार्दिक पांड्या आणि महेंद्रसिंह धोनी यांनी मालिकेत फारशी चमकदार कामगिरी केलेली नाही. त्यामुळे आता कर्णधार कोहली प्लेईंग इलेव्हनमध्ये काही बदल करणार का? हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.

शेवटच्या सामन्यात दिनेश कार्तिक, मनिष पांडे, केदार यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर गोलंदाजांमध्येही काही जणांना संधी मिळू शकते.

दुसरीकडे मालिका गमावलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ शेवटचा सामना जिंकण्याचा कसोशीने प्रयत्न करेल. त्यामुळे या सामन्यासाठी ते देखील संघात काही बदल करु शकतात.

भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी, हार्दिक पंड्या, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर.

दक्षिण अफ्रिका : एडिन मार्करम (कर्णधार), हाशिम अमला, एबी डिविलियर्स, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), ज्यां पॉल ड्यूमिनी, फरहान बेहरदीन, इमरान ताहिर, हेइनरिक क्लासेन, डेविड मिलर, मोर्ने मोर्कल, क्रिस मौरिस, लुंगी एन्गिडी, आंदिले फेहुलकवायो, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, खायो जोंडो.