मुंबई : भारत आणि इंग्लंड संघांमधली ओव्हलची पाचवी कसोटी आता तोंडावर आली आहे. पण टीम इंडियानं चौथ्या कसोटी सामन्यासह मालिकाही गमावून आपली अब्रू गमावली. आता इंग्लंड दौऱ्यातली उरलीसुरली लाज राखायची, तर भारताला पाचवी कसोटी जिंकणं आवश्यक आहे. त्यासाठी कर्णधार विराट कोहलीला आणखी एका भरवशाच्या फलंदाजाची साथ हवी आहे.


विराट कोहलीनं 2014 सालच्या इंग्लंड दौऱ्यातलं अपयश 2018 साली धुवून काढलं. टीम इंडियाच्या कर्णधारानं चार कसोटी सामन्यांमधल्या आठ डावांमध्ये 544 धावांचा डोंगर उभारला. पण दुर्दैव विराटच्या या सातत्याला दुसऱ्या टोकाकडून साथच लाभली नाही. आणि इंग्लंडनं साऊदम्प्टन कसोटी जिंकून पाच कसोटी सामन्यांची मालिका आपल्या खिशात घातली.

विराट कोहली हा आजच्या जमान्यातला सर्वोत्तम फलंदाज आहे, यात कुणाच्याही मनात शंका नाही. पण क्रिकेटसारख्या सांघिक खेळात एकटा सचिन तेंडुलकर किंवा एकटा विराट कोहली तुम्हाला कधीच जिंकून देऊन शकत नाही.

इंग्लंड दौऱ्यातल्या पहिल्या चार कसोटी सामन्यांत चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेनंही धावा केल्या आहेत. पण जिंकायचं म्हटलं की, टीम इंडिया म्हणजे वन मॅन शो हे समीकरण ठरलेलं आहे. त्यात सलामीच्या मुरली विजय आणि लोकेश राहुल यांची तर धावांच्या नावानं बोंबच झाली. कसोटी क्रिकेटमध्ये शिखर धवन भारतीय संघाचं ओझं एकट्याच्या खांद्यावरून वाहून नेऊ शकत नाही, यावरही पुन्हा शिक्कामोर्तब झालं. या परिस्थितीत टीम इंडियासमोर सलामीचा उदयोन्मुख फलंदाज पृथ्वी शॉकडे वळण्याशिवाय खरोखरच पर्याय दिसत नाही.

पृथ्वीनं गेल्या दीड वर्षात 14 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 56.72 च्या सरासरीनं 1418 धावांचा रतीब घातला आहे. त्यात सात शतकं आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. अ दर्जाच्या क्रिकेटमध्येही त्याच्या नावावर 19 सामन्यांत 651 धावा जमा आहेत. त्यात दोन शतकं आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सरासरी आहे 34.36. पृथ्वीच्या नेतृत्वाखाली भारतानं अंडर नाईन्टीन विश्वचषकावरही यंदा आपलं नाव कोरलं. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात पृथ्वी थोरामोठ्यांच्या अगदी खांद्याला खांदा भिडवून खेळला.

पृथ्वीची ताजी कामगिरी लक्षात घेता, लोकेश राहुलऐवजी त्याला पाचव्या कसोटीसाठी संधी मिळण्याची चिन्हं आहेत. पण पृथ्वीचं वय जेमतेम 18-19 वर्षांचं वय लक्षात घेता, त्याला आपली गुणवत्ता दाखवून देण्यासाठी पुरेशी संधी मिळण्याची आवश्यकता आहे. पृथ्वी शॉसारखा फलंदाज हे भारतीय क्रिकेटचं भविष्य आहे. आणि ते भविष्य जपण्याची जबाबदारी ही बीसीसीआयची आहे.