मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा आवडता खेळाडू अजूनही संघाबाहेर आहे. भारतीय संघात त्याची निवड झाली असली, तरी प्लेईंग इलेव्हनमध्ये त्याला अजूनही स्थान मिळालेलं नाही. तो खेळाडू म्हणजे के एल राहुल होय.
के एल राहुल हा भारताचा तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि शैलीदार फलंदाज म्हणून ओळखला जातो. मात्र सध्या भारतीय संघात त्याला कितव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी संधी द्यावी हा मोठा प्रश्न आहे. कारण सर्व जागा त्या-त्या खेळाडूंनी भक्कम करुन ठेवल्या आहेत. त्यामुळेच लोकेश राहुल बाहेर आहे.
कोहलीची स्तुतीसुमनं
“राहुल हा अत्यंत प्रतिभाशाली खेळाडू आहे. त्याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये स्वत:ला सिद्ध केलं आहे. त्याच्यात पात्रता आहे, त्यामुळे अशा खेळाडूला पाठिंबा देणं/सपोर्ट करणं आवश्यक आहे. एकदा टीममधील त्याची भूमिका स्पष्ट झाली, तर हा खेळाडू सामना जिंकून देऊ शकतो”, असं विराट कोहली 15 दिवसांपूर्वी म्हणाला होता.
मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डेसाठी त्याला संधी मिळाली नाही, त्याच्याऐवजी मनीष पांडेला संघात स्थान देण्यात आलं.
त्यानंतर पुढील चार वन डे आणि टी ट्वेण्टीमध्येही राहुल बाहेरच राहिला.
एमएसके प्रसाद यांचं म्हणणं
यानंतर टीम इंडियाचे निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी, राहुलला चौथ्या नंबरसाठी तयार करण्यात येत असल्याचं सांगितलं. अन्य खेळाडूंच्या भूमिकेबाबतही प्रयोग सुरु आहेत, असंही त्यांनी म्हटलं होतं.
त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झाली. यामध्ये सलग अर्धशतकं झळकावलेल्या अजिंक्य रहाणेला वगळण्यात आलं, तर के एल राहुलची निवड झाली. पण राहुलला अद्याप संधीच मिळाली नाही.
राहुलची कामगिरी
के एल राहुलने यापूर्वी मिळालेल्या संधीचं बहुतेकवेळा सोनं केलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने 199 धावा ठोकल्या होत्या.
टी ट्वेण्टीमध्ये राहुलने 9 सामन्यात 52 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. मात्र भारतीय संघात अजूनही त्याला स्थान मिळू शकलेलं नाही.
त्यातच मनीष पांडे आणि केदार जाधव यांनी मधल्या फळीत आपलं स्थान कायम ठेवलं आहे. त्यामुळे राहुलला कोणत्या जागी स्थान द्यायचं हा निवड समितीसमोर प्रश्न आहे.
कोहलीचा आवडता खेळाडू, मात्र अजूनही संघाबाहेरच!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Oct 2017 11:50 AM (IST)
विराट कोहलीचा आवडता खेळाडू अजूनही संघाबाहेर आहे. भारतीय संघात त्याची निवड झाली असली, तरी प्लेईंग इलेव्हनमध्ये त्याला अजूनही स्थान मिळालेलं नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -