Bray Wyatt : WWE मध्ये ब्रे वायट (Bray Wyatt) नावाने ओळखला जाणाऱ्या विंडहॅम रोटुंडा (Windham Rotunda) याचं निधन झालं. तो केवळ 36 वर्षांचा होता. वायटची प्रकृती काही दिवसांपासून खालावली होती, त्याची अवस्था गंभीर होती. आजारपणामुळे तो रेसलिंग रिंग आणि टीव्हीपासून दूर होता. परंतु गुरुवारी (24 ऑगस्ट) त्याचा अनपेक्षित आणि आकस्मिक मृत्यू झाल्याचं कुटुंबियांनी म्हटलं. विंडहॅम रोटुंडाचे वडील माईक रोटुंडा आणि आजोबा ब्लॅकजॅक मुलिगन हे देखील WWE (World Wrestling Entertainment) मध्ये रेसलर होते.
WWE ने ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. ब्रे वायटच्या निधनामुळे WWE वर शोककळा पसरली आहे.
पुनरागमनाची अटकळ
रेसलमेनिया 39 मध्ये ब्रे वायट सहभागी होऊ शकलेला नव्हता. या इव्हेंटमध्ये त्याचा सामना बॉबी लॅशलेविरुद्ध होण्याची अपेक्षा होती. परंतु या इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना वैद्यकीयदृष्ट्या मंजुरी मिळालेल नव्हती. नुकतंच ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला त्याच्या पुनरागमनाची शक्यता वर्तवली जात होती. परतल्यानंतर दोन्ही स्टार रेसलरमध्ये दमदार सामन्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं सांगितलं जात होतं, परंतु गुरुवारी (24 ऑगस्ट) त्याचं निधन झालं.
WrestleMania 39 च्या आधीच ब्रे वायट अचानक रिंगमधून गायब झाल्यानंतर त्याचे चाहते काळजीत पडले होते. त्याला नेमकं काय झालं हे कोणालाच माहित नव्हतं. नंतर तो कोणत्यातरी आजाराने ग्रस्त असल्याचं समोर आलं. त्यामुळे तो रेसलिंगपासून दूर झाला होता. परंतु आजपर्यंत त्याच्या आजाराबाबत कोणालाही माहिती नाही.
कशी होतं ब्रे वायटची कारकीर्द?
ब्रे वायट दोन वेळा WWE युनिव्हर्सल आणि एक वेळा WWE चॅम्पियन ठरला होता. मॅट हार्डीसह त्याने WWE रॉ टॅग टीम चॅम्पियनशिपचं जेतेपद पटकावलं होतं. तर 2019 मध्ये वायटची WWE मेल रेसलर ऑफ द ईयर म्हणून निवड झाली होती.
विंडहॅम रोटुंडाचं खासगी आयुष्य
विंडहॅम रोटुंडाचा 2012 मध्ये समंथासोबत विवाह झाला होता. त्यांना दोन मुली आहे. मात्र 2017 मध्ये दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान रोटुंडा आणि WWE रिंग अनाऊन्सर जोजो एकत्र असल्याचं समोर आलं होतं. जोजोने 2019 मध्ये मुलगा आणि 2020 मध्ये मुलाला जन्म दिला होता. रोटुंडा आणि जोजो यांनी मागील वर्षी साखरपुडा केला होता.