कॅण्डी : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या वन डेत प्रेक्षकांचा अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. भारताला विजयासाठी केवळ 8 धावांची आवश्यकता असताना प्रेक्षकांनी मैदानात बाटल्या फेकल्या.


प्रेक्षकांच्या या हुल्लडबाजीमुळे खेळ 35 मिनिटे थांबवावा लागला. प्रेक्षकांनी मैदानात बॉटल फेकण्यास सुरुवात केली तेव्हा भारताची धावसंख्या 44 षटकांमध्ये 210 अशी होती आणि विजयासाठी केवळ 8 धावांची आवश्यकता होती.

खेळ थांबला तेव्हा रोहित शर्मा 122 आणि महेंद्र सिंह धोनी 61 धावांवर खेळत होते. खेळ थांबवून प्रेक्षकांना शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तोपर्यंत धोनी आणि रोहित शर्मा मैदानातच बसले. श्रीलंकेच्या प्रेक्षकांनी जास्त हुल्लडबाजी केल्यामुळे खेळाडूंना ड्रेसिंग रुममध्ये पाठवण्यात आलं.

प्रेक्षकांना हटवण्यासाठी सुरक्षा बलाचाही वापर करावा लागला. मैदानातील या प्रकाराने 1996 सालच्या विश्वचषकातील आठवणी ताज्या केल्या. कोलकात्यातील ईडन गार्डनवर श्रीलंकेविरुद्ध भारताची डळमळीत अवस्था झाल्यानंतरही प्रेक्षकांनी असाच गोंधळ घातला होता.

मैदानात प्रेक्षकांचा हा हुल्लडबाजपणा सुरु होता, तेव्हा एक जण शांतपणे सर्व पाहत होता. तो दुसरा तिसरा कोणी नाही, तर टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी होता. प्रेक्षक मैदानात बाटल्या फेकत होते, तेव्हा धोनी मैदानातच झोपून आराम करत होता.

श्रीलंकेचे खेळाडू उभे राहून खेळ सुरु होण्याची वाट पाहत होते, तेव्हा धोनी झोपून आराम करत होता. धोनीचा मैदानातील हा शातंपणा सोशल मीडियावरही चर्चेचा विषय राहिला.