मुंबई : मुंबई पाठोपाठ आता पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर होणाऱ्या आयपीएल सामन्यांसाठी पाणी कुठून आणणार? असा सवाल करत मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला यावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. बुधवारी होणाऱ्या पुढील सुनावणीत एमसीएला यावर उत्तर द्यायचं आहे.


पुण्यातील गहुंजे स्टेडियमला चेन्नईत रद्द झालेले सामने पुण्यात हलवण्याचा आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलने निर्णय घेतला. तामिळनाडूत पेटलेल्या कावेरी पाणी वाटपावरून चेन्नई सुपरकिंग्सचे घरच्या मैदानातील सर्व सामने अचानकपणे रद्द करण्यात आले.

महाराष्ट्रात होणाऱ्या आयपीएल सामन्यांसाठी अतिरिक्त पाणी पुरवठा करण्याला विरोध करत लोकसत्ता मूव्हमेंट या सेवाभावी संस्थेने हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली.

या याचिकेला उत्तर देताना मुंबई महानगरपालिकेने पुढील किमान पाच वर्ष वानखेडे स्टेडियमला कोणताही अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यास नकार दिला. मात्र आयपीएलसाठी वानखेडे स्टेडियमला आपल्या जवळचं 'खास' पाणी देण्यास तयार असल्याचं मुंबई महानगरपालिकेने हायकोर्टात सांगितलं. अर्थातच हे 'खास' पाणी म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनला पालिकेकडून विकत घ्यावं लागणारं पाणी आहे.