Virat Kohli : टीम इंडियाचा किंग कोहली (Virat Kohli) इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीतून तडकाफडकी माघार घेतल्यानंतर सुरु झालेली चर्चा अजूनही कायम आहे. एका बाजू रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राजा कोहलीलाही निमंत्रित करण्यात आले होते, मात्र तो तिथं सुद्धा पोहोचला नाही. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. 






कोहलीने माघार घेतल्यानंतर बीसीसीआयने वैयक्तिक कारणांमुळे विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघातून माघार घेतल्याचे सांगितले होते. त्यामुळे किंग कोहलीच्या अचानक माघारीने सोशल मीडियावर अनेक अफवा पसरल्या.  अलीकडेच विराट त्याच्या आईच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हैदराबाद कसोटीतून बाहेर असल्याची बातमी आली होती. आता कोहलीच्या भावाने ही बातमी खोटी ठरवत आईची तब्येत पूर्णपणे ठीक असल्याचे सांगितले. विराट कोहलीच्या भावाने इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली असून त्याची आई सरोज कोहली यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले आहे. त्यांनी आईच्या तब्येतीच्या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं आहे. खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही केले आहे.


विराट भारतीय संघासाठी इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळू शकला नव्हता, ज्यामध्ये टीम इंडियाला 28 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. आता दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. दुसरीकडे, अष्टपैलू रवींद्र जाडेजा आणि केएल राहुल दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडले आहेत. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. दुसरा कसोटी सामन्यात टीम इंडियाला चार दिग्गजांशिवाय खेळावं लागणार आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करणं फार कठीण जाणार आहे. चौघांच्याही अनुपस्थितीत रोहित शर्मासह इतर खेळाडूंवर अनेक जबाबदाऱ्या वाढणार आहेत. विशाखापट्टणम कसोटीत भारतीय क्रिकेट संघ रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर/कुलदीप यादव या तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो. 


इतर महत्वाच्या बातम्या