किंग्स्टन (जमेका): भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये पाचव्या आणि मालिकेतील अखेरच्या एकदिवसीय सामन्यात वेस्टइंडिजनं भारतासमोर 206 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 50 षटकात 9 गड्यांच्या मोबदल्यात वेस्टइंडिजनं 205 धावांपर्यंतच मजल मारली. मोहम्मद शमीनं 4 गडी बाद केले तर उमेश यादवनं तीन फलंदाजांना बाद करत वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना लगाम घातला. वेस्ट इंडिजकडून फक्त शाई होपनं अर्धशतक झळकावलं.
दरम्यान, 205 धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताची सुरवातही अडखळती झाली असून शिखर धवन अवघ्या 4 धावांवर बाद होऊन माघारी परतला आहे.
शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव करुन मालिका खिशात घालण्याची नामी संधी कोहलीच्या टीम इंडियासमोर आहे.
चौथ्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या 190 धावांचं आव्हानही भारताला पेलता आलं नव्हतं. दिग्गज फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानं भारताला 11 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे या सामन्यात नेमकं काय होणार याकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून राहिलं आहे.