'आम्रपाली'सोबतच्या ब्रेकअपनंतर भज्जी म्हणाला, वेल डन धोनी !
एबीपी माझा वेब टीम | 16 Apr 2016 08:19 AM (IST)
मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने रियल इस्टेट कंपनी आम्रपाली ग्रुपसोबतचा करार रद्द केल्यानंतर, फिरकीपटू हरभजन सिंहने कौतुक केलं आहे. हरभजनने ट्विट करून धोनीचं कौतुक केलं आहे. "आम्रपाली बिल्डर्ससोबतचं नातं तोडून धोनी तू चांगलं काम केलं आहेस. 2011 विश्वचषकानंतर त्यांनी आपल्याला घरं देण्याची घोषणा केली होती, मात्र त्यांनी अद्याप दिलेलं नाही", असं ट्विट भज्जीने केलं आहे. यानंतर एका ट्विटवर प्रतिक्रिया देताना हरभजन म्हणतो, " आम्हाला घरं देण्याची घोषणा हा त्यांचा पब्लिसिटी स्टंट असू शकतो. मात्र किमान ज्यांनी पैसे दिलेत त्यांना तरी घरं द्यायला हवी. " धोनी - आम्रपाली ग्रुपचं ब्रेकअप रियल इस्टेट कंपनी आम्रपाली ग्रुप आणि टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांचं ब्रेक अप झालं आहे. धोनी यापुढे आम्रपाली ग्रुपचा ब्रँड अँबेसेडर नसेल. त्यामुळे धोनी यापुढे आम्रपाली ग्रुपच्या जाहिराती करणार नाही. आम्रपाली बिल्डरने वेळेत घरं न दिल्याने या घरांच्या जाहिराती करणाऱ्या धोनीविरोधात सोशल मीडियावर मोहिम उघडण्यात आली होती. धोनीने आमची घरं मिळवून द्यावी, अशी मागणी सोशल मीडियावर होत होती. त्यानंतर धोनीने करार संपुष्टात आणला.