नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये 2019 ला खेळवल्या जाणाऱ्या विश्वचषकातील भारतीय संघाची रचना येत्या पाच महिन्यात स्पष्ट होईल, असं निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी म्हटलं आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी गोलंदाज मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांच्यासोबतच फिरकीपटू रवींद्र जाडेजा आणि आर. अश्विनलाही विश्रांती देण्यात आली आहे. रोटेशन धोरणानुसार त्यांना विश्रांती देण्यात आल्याचं एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केलं.

येत्या पाच महिन्यात निवडक खेळाडूंना रोटेशन धोरणानुसार संधी देण्यात येईल. काही प्रमुख खेळाडूंसाठी सध्या रोटेशन धोरणाचा वापर करत आहोत, जेणेकरुन युवा खेळाडूंच्या कामगिरीचं मुल्यमापन करता येईल आणि या वर्षाअखेरपर्यंत भारतीय संघाची रचना ठरवता येईल, असं एमएसके प्रसाद म्हणाले.

श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेत सलामीवीर केएल राहुलला चौथ्या क्रमांकावर खेळवलं जाईल. तो असा खेळाडू आहे, ज्याला संघातून बाहेर बसवणं अशक्य आहे. या वर्षाअखेरपर्यंत खेळाडूंच्या वेगवेगळ्या जोड्यांचा प्रयोग करु, अशी माहिती एमएसके प्रसाद यांनी दिली.

खेळाडूंचा फिटनेस हा देखील महत्त्वाचा मुद्दा असेल, असं एमएसके प्रसाद यांनी सांगितलं. चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळाडूंचा फिटनेस पाहिल्यानंतर त्यावर आणखी लक्ष केंद्रीत करण्याचं ठरवलं आहे. फिटनेससाठी एक धोरण ठरवलं जाईल, जे सर्वांना पाळावं लागेल. खेळाडूंच्या कौशल्याच्या बाबतीत भारतीय संघ जगातील अव्वल संघ आहे. पण फक्त फिटनेसवर लक्ष देण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.

विश्वचषक संघात जागा मिळवण्याच्या स्पर्धेत टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी, युवराज सिंह आणि सुरेश रैनाही आहेत, असं एमएसके प्रसाद यांनी सांगितलं.

ऋषभ पंतच्या बाबतीतही एमएसके प्रसाद यांना विचारण्यात आलं. तो एक चांगला टी-20 खेळाडू आहे. त्याला वन डेमध्ये संधी दिली जाईल, असं एमएसके प्रसाद यांनी स्पष्ट केलं. तर हार्दिक पंड्याने टी-20 क्रिकेटपासूनच स्वतःची जागा निर्माण केली आहे. त्याला आणखी संधी देण्यात येईल, जेणेकरुन त्याचा आत्मविश्वास वाढेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.