मुंबई: भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची घोषणा लांबणीवर पडली आहे. आज दिवसभरात मुख्य प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री आणि वीरेंद्र सहवाग यांच्या मुलाखती झाल्या.  त्यानंतर सौरव गांगुलीनं पत्रकार परिषद घेऊन आजच्या घडामोडींची माहिती दिली.


'श्रीलंका दौरा एवढंच आमच्या डोळ्यासमोर नाही. त्यामुळे प्रशिक्षक निवडीसाठी आम्हाला आणखी वेळ हवा आहे. तसंच बऱ्याच जणांशी चर्चाही बाकी आहे. तसेच टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीही भारतात परतल्यावर त्याच्याशी चर्चा केली जाईल. त्यांनतरच प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा करु.' असं गांगुलीनं यावेळी स्पष्ट केलं.

दरम्यान, टीम इंडियाचे माजी संचालक रवी शास्त्री, टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सहवाग, इंग्लंडचे क्रिकेटर रिचर्ड पायबस, वेस्ट इंडिजचे फिल सिमन्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आणि श्रीलंकेचे माजी कोच टॉम मुडी आणि सध्याचे अफगाणिस्तान क्रिकेट टीमचे कोच लालचंद राजपूत यांनी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केलेला आहे.

वीरेंद्र सेहवागने मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात मुलाखतीसाठी हजेरी लावली होती. क्रिकेट सल्लागार समितीनं त्याची मुलाखती घेतली. सल्लागार समितीचे सदस्य सचिन तेंडुलकर लंडनमधून स्काईपद्वारे मुलाखतीत हजर होता.  तर सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण बीसीसीआयच्या मुख्यालयात उपस्थित होते. वीरेंद्र सेहवागसोबतच रवी शास्त्रीचीही मुलाखत आज पार पडली.

दरम्यान, टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री यांच्या नावाचीच जोरदार चर्चा आहे. टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या दोघांशीही रवी शास्त्री यांचे चांगले संबंध आहेत.

तर दुसरीकडे टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागही अंतिम सहा जणांमध्ये आहे. सेहवागने दोन ओळींचा बायोडेटा प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयकडे पाठवला होता. शिवाय, आपलं नावच खूप आहे, असंही सेहवागने म्हटलं होतं. आता टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी कुणाची निवड होईल, याची उत्सुकता अवघ्या क्रिकेटविश्वाला लागली आहे.