कोलकाता : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळालेल्या लाजिरवाण्या पराभवामुळे टीम इंडियावर चौफेर टीका होत आहे. कर्णधार विराट कोहलीच्या काही निर्णयांवरही काही माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. यामध्ये आता भारताचा फिरकीपटू गोलंदाज हरभजन सिंहचाही समावेश झाला आहे.


''दक्षिण आफ्रिकेत जाण्यापूर्वी खेळलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून भारताने काहीच मिळवलं नाही'', असं हरभजनने म्हटलं आहे. भारताला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून फार काही फायदा झाला नाही, असं तो म्हणाला.

भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका गमावली आहे. 2-0 ने पिछाडीवर असलेल्या टीम इंडियावर आता व्हाईटवॉशपासून वाचण्याचं आव्हान आहे.

सैय्यद मुश्ताक अली टी-20 टूर्नामेंटमधील सामन्यानंतर भारतीय संघाच्या पूर्वतयारीवर हरभजन बोलत होता. ''श्रीलंकेविरुद्ध मायदेशात खेळलेल्या मालिकेतून भारताला काहीही मिळालं नाही. त्यापेक्षा काही खेळाडूंनी अगोदरच दक्षिण आफ्रिकेत जाऊन तयारी करणं गरजेचं होतं. किमान धर्मशालेचं मैदानही पर्यायी जागा म्हणून चांगली होती,'' असं हरभजन म्हणाला.

दरम्यान, अजिंक्य रहाणे आणि गोलंदाज भुवनेश्वर कुमारला अंतिम अकरा जणांमध्ये संधी न दिल्यामुळेही हरभजनने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ''रहाणे खेळला असता तर निकाल काही वेगळा आला असता, याची काही शाश्वती नाही. रहाणे संघात असणं आणि नसणं यावर प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं. मात्र भुवनेश्वर संघात असायला हवा होता,'' असं हरभजन म्हणाला.

''सध्याच्या काळात भुवनेश्वर कुमार इशांत शर्मापेक्षा मोठा मॅच विनर आहे. भुवीने चांगली कामगिरी केली, तेव्हा भारतीय संघानेही चांगली कामगिरी केलेली आहे. अजूनही सगळं काही संपलेलं नाही. जोहान्सबर्गमध्ये खेळवण्यात येणाऱ्या तिसऱ्या कसोटीतूनही आपण पुनरागमन करु शकतो,'' असं हरभजन म्हणाला.

दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना 24 जानेवारीपासून जोहान्सबर्गमध्ये खेळवण्यात येणार आहे. दक्षिण आफ्रिकेने या मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे.