मुंबई : ''टी-20 क्रिकेटमध्ये हारू किंवा जिंकू, आम्ही त्याचा विचार करत नाही, फक्त युवा खेळाडूंना संधी मिळते आणि त्यातून 2019 साठी चांगले खेळाडू निवडता येतील, एवढंच आमचं ध्येय असतं'', असं टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले.
मुंबईत झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सामन्यातील विजयानंतर रवी शास्त्री बोलत होते. त्यांनी गोलंदाज जयदेव उनाडकट आणि सलामीवीर फलंदाज केएल राहुल यांच्या कामगिरीचं कौतुक केलं.
''जयदेव उनाडकटने अनेक महत्त्वाचे बदल स्वतःमध्ये केले आहेत. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून तो क्रिकेट खेळत आहे. मात्र त्याची गोलंदाजी का महत्त्वाची आहे, ते त्याला आता समजायला लागलं आहे'', असंही रवी शास्त्री म्हणाले.
सलामीवीर फलंदाज केएल राहुलच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. ''राहुल हा अप्रतिम खेळाडू आहे. त्याला सेट होण्यासाठी वेळ मिळाला, त्याचा फायदा घेत त्याने प्रत्येक प्रकारचे शॉट मारले. गेल्या 18-20 महिन्यांपासून स्वतःमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवणारा तो एकमेव खेळाडू आहे'', असं रवी शास्त्रींनी सांगितलं.
टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्च्या तिसऱ्या ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यात पाच विकेट्सने विजय मिळवला. या विजयासाह भारताने ही मालिका 3-0 अशी जिंकून निर्विवाद वर्चस्व गाजवलं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला.
श्रीलंकेने दिलेलं 136 धावांचं आव्हान भारतीय फलंदाजांनी शेवटच्या षटकात चार चेंडू राखून पूर्ण केलं. भारताकडून मनीष पांडेने चौकारांसह 32 धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने 30 आणि कर्णधार रोहित शर्माने 27 धावांचं योगदान दिलं.