लंडन : इंग्लंडने टीम इंडियाचा आठ विकेट्सने धुव्वा उडवून, तीन वन डे सामन्यांची मालिका 2-1 अशी खिशात घातली. भारताचा हा वन डे सामन्यांच्या मालिकांमधल्या सलग नऊ विजयांनंतरचा पहिला पराभव ठरला. लीड्सच्या तिसऱ्या वन डेत भारताने इंग्लंडला विजयासाठी 257 धावांचं माफक आव्हान दिलं होतं.

या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीने सर्वांचं मन जिंकलं. फिटनेस राहिला नसल्याचं कारण पुढे करत त्याच्या निवृत्तीची मागणी करणाऱ्यांसाठी ती एक चपराक होती. भारतीय संघ विकेटसाठी संघर्ष करत असताना धोनीने महत्त्वाच्या फलंदाजाला माघारी धाडलं.


टीम इंडियाचा अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनी खरंच थकला आहे का? धोनीने आता वन डे क्रिकेटमधूनही तातडीने निवृत्त होण्याची गरज आहे का? यावर तिसऱ्या वन डेनंतर चर्चा सुरु झाली आहे. इंग्लंड दौऱ्यातल्या लागोपाठ दोन वन डे सामन्यांमध्ये आणि पर्यायाने मालिकेतही टीम इंडियाला स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाचं खापर धोनीवर फोडण्यात येत आहे.

धोनीच्या निवृत्तीची चर्चा कशामुळे?

सामना गमावल्यानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. ही नुसती अफवा नसून धोनीने आपल्या कृतीतून तसे संकेत दिले आहेत. कालचा सामना संपल्यानंतर खेळाडू सोबत ड्रेसिंग रुममध्ये परतत असताना धोनीने पंचांकडून सामन्यातील चेंडू घेतला.

पंचांकडून चेंडू घेतानाचा धोनीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या आधारावर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकणार असल्याचे अंदाज बांधण्यात येत आहेत.


धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेताना असंच केलं होतं. धोनीचा शेवटचा कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. सामना संपल्यानंतर धोनीने पंचांकडून मैदानातील स्टम्प्स घेतले होते आणि त्यानंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळेच कालच्या सामन्यानंतर ही नवी चर्चा सुरु झाली आहे.