Washington Sundar : टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्यात कसोटीत वाॅशिंग्टन सुंदरने धमाकेदार फिरकी गोलंदाजी करताना पाहुण्या संघाला 259 धावांत गारद केले. तीन वर्षांनी पुनरागमन करत असलेल्या सुंदरने 59 धावांत 7 जणांना माघारी धाडत टीम इंडियाला संकटातून तारले. पहिल्या कसोटीत टीम इंडियाला दारुण पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. दरम्यान, पहिल्या दिवशी प्रत्युत्तरात भारताने खेळ संपेपर्यंत एक गडी गमावून 16 धावा केल्या. शुभमन गिल 10 आणि यशस्वी जैस्वाल 5 धावांवर नाबाद आहे. पहिली कसोटी जिंकून न्यूझीलंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारतीय संघात तीन बदल
दुसऱ्या कसोटीत भारतीय संघातून मोहम्मद सिराज, केएल राहुल आणि कुलदीप यादव यांना वगळण्यात आले. या तिघांच्या जागी आकाश दीप, शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदरचे भारतीय संघात पुनरागमन झाले. मॅट हेन्रीच्या जागी मिशेल सँटनरचा न्यूझीलंड संघात समावेश करण्यात आला. बंगळूर कसोटीत हेन्रीने 8 विकेट घेतल्या होत्या. पहिल्या डावात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली होती. तिसऱ्याच षटकात टीम साऊदीच्या गोलंदाजीवर भारतीय संघाने कर्णधार रोहित शर्माची विकेट गमावली. रोहितने 9 चेंडूंचा सामना केला आणि त्याला खातेही उघडता आले नाही. यानंतर शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी पहिल्या दिवशी भारताचे आणखी नुकसान होऊ दिले नाही.
सुंदरसाठी टीम इंडियाची वेगळीच चाल
मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारतीय प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी एक वेगळीच चाल केली जी दुसऱ्या कसोटीत प्रभावी ठरली. स्टार फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरचा संघात समावेश करणे ही मोठी खेळी होती. पुण्यात दुसरी कसोटी सुरू झाली तेव्हा कुलदीप यादवच्या जागी कर्णधार रोहित शर्माने सुंदरला प्लेइंग-11 मध्ये घेतले. संधी मिळताच सुंदरने विकेट घेत न्यूझीलंडला गारद केले. पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांवर फिरकीपटूंचे वर्चस्व राहिले. सर्व 10 विकेट वॉशिंग्टन सुंदर आणि रविचंद्रन अश्विन या फिरकीपटूंनी घेतल्या. ऑफस्पिनर सुंदरने 59 धावांत सर्वाधिक 7 बळी घेतले. अश्विनने 64 धावांत 3 बळी घेतले.
सुंदरकडून 5 क्लीन बोल्ड
वॉशिंग्टन सुंदरने आपल्या कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच एका डावात 5 विकेट्स घेतल्या आहेत. या पहिल्या डावात सुंदरने आपल्या गोलंदाजीने 5 फलंदाजांना क्लीन बोल्ड केले. हा देखील एक विक्रम आहे, तर 1 फलंदाज LBW आणि 1 झेल बाद झाला. यासह सुंदर पुण्याच्या मैदानावर 7 विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.
सुंदरने सात विकेट घेतल्या
नाणेफेक जिंकल्यानंतर न्यूझीलंड संघाने चांगली सुरुवात केली. किवी संघाने एकवेळ बिनबाद 32 धावा केल्या होत्या, या धावसंख्येवर भारताला पहिले यश मिळाले. आश्विनने न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमला (15) पायचीत केले आणि तो एलबीडब्ल्यू झाला. न्यूझीलंडला दुसरा धक्का विल यंगच्या (18) रूपाने पडला. जो अश्विनच्या चेंडूवर यष्टिरक्षक पंतने झेलबाद झाला. यानंतर रचिन रवींद्र आणि डेव्हन कॉनवे (76) यांनी स्कोअरकार्ड 138 पर्यंत नेले. रचिन आणि कॉनवे सेटल झाल्याचंही वाटत होतं, पण अश्विन पुन्हा एकदा भारतासाठी ट्रबलशूटर ठरला आणि भारताची तिसरी विकेट मिळवली. रचिन रवींद्र पुण्यातही फॉर्मात होता, तो शतक करेल असे वाटत होते, पण तो वॉशिंग्टन सुंदरच्या फिरकीत झेलबाद झाला आणि 65 धावा करून क्लीन बोल्ड झाला.
यानंतर न्यूझीलंड संघाच्या खात्यात आणखी 4 धावा जमा झाल्या आणि यष्टीरक्षक फलंदाज टॉम ब्लंडेल (3) 3 धावा करून क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर सुंदरने डॅरिल मिशेलला (18) एलबीडब्ल्यू बाद करून न्यूझीलंडला सहावा धक्का दिला. ग्लेन फिलिप्स काही विशेष करू शकला नाही आणि त्यालाही सुंदरने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. फिलिप्स बाद झाला तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या 236/7 अशी होती. यानंतर सुंदरने टीम साऊदी (5), एजाज पटेल (4) आणि मिचेल सँटनर (33) यांना बाद करत न्यूझीलंडचा डाव गुंडाळला. सुंदरने 59 धावांत सात गडी बाद केले. सुंदरने पहिल्यांदाच कसोटी डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. आर अश्विनने तीन विकेट घेतल्या.
भारतातील कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पहिल्या डावातील सर्व 10 बळी (स्पिनर)
- भारत विरुद्ध न्यूझीलंड पुणे 2024
- भारत विरुद्ध इंग्लंड धर्मशाला 2024
- भारत विरुद्ध इंग्लंड चेन्नई 1973
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चेन्नई 1964
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कोलकाता 1956
- इंग्लंड विरुद्ध भारत कानपूर 1952
न्यूझीलंडविरुद्ध सर्वोत्तम आकडे (भारतीय गोलंदाज)
- 8/72 एस. वेंकटराघवन दिल्ली 1965
- 8/76 एरापल्ली प्रसन्न ऑकलंड 1975
- 7/59 आर. अश्विन इंदूर 2017
- 7/59 वॉशिंग्टन सुंदर पुणे 2024
इतर महत्वाच्या बातम्या