कोलकाता : टीम इंडियाचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवची ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरला एकापेक्षा अधिक वेळा बाद करण्याची इच्छा आहे. वॉर्नर माझ्या गोलंदाजीवर खेळत असताना दबावात असतो, असंही कुलदीपने म्हटलं आहे.


चेन्नईतील पहिल्या वन डेत माझ्या गोलंदाजीचा सामना करताना डेव्हिड वॉर्नर दबावात होता, असं कुलदीप म्हणाला. हा दबाव पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या चेहऱ्यावर पाहायचा आहे, असंही कुलदीपने सांगितलं.

कोलकात्यामध्ये उभय संघ पुन्हा एकदा भिडणार आहेत. त्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कुलदीपने पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. तुम्ही चांगले फलंदाज असाल तर कोणत्याही प्रकारचा दबाव तुमच्यावर नसतो. मात्र माझ्या गोलंदाजीवर खेळताना वॉर्नर दबावात होता असं जाणवलं. त्याला असं वाटत होतं की मी त्याला कधीही बाद करु शकतो, अशी माहिती कुलदीपने दिली.

वॉर्नरविरोधात गोलंदाजी करण्यासाठी खास योजना आखलेली आहे. पुढच्या चार सामन्यांमध्येही त्याला बाद करण्याची संधी मिळेल, अशी आशा कुलदीपने व्यक्त केली. चेन्नई वन डेत कुलदीपने वॉर्नरला धोनीच्या हातात झेल द्यायला भाग पाडून माघारी पाठवलं होतं.

यापूर्वीही धर्माशालेच्या मैदानात कुलदीपने त्याच्या पदार्पणाच्या कसोटीतच वॉर्नरला बाद केलं होतं. दरम्यान स्टीव्ह स्मिथला बाद करणं सर्वात कठिण असल्याचंही कुलदीप म्हणाला.