मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये अव्वलस्थानी येण्याचा मान पहिल्यांदाच मिळवला आहे. ताज्या आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये विराटने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथला मागे टाकत पहिलं स्थान मिळवलं.


विराटच्या खात्यात सध्या 934 रेटिंग पॉईंट्स आहेत. बॉल टॅम्परिंग प्रकरणात सध्या निलंबित असलेल्या स्टीव्ह स्मिथची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतर कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान मिळवणारा विराट कोहली पहिलाच खेळाडू ठरला. सचिन तेंडुलकरने यापूर्वी 2001 मध्ये हा विक्रम केला होता.

इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराट कोहलीने हा विक्रम नावावर केला. या कसोटीत त्याने पहिल्या डावात एकाकी झुंज देत 149 आणि दुसऱ्या डावात 51 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. या कसोटीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला.

या ताज्या रँकिंगमध्ये इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट तिसऱ्या स्थानावर आहे, तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन चौथ्या स्थानावर आहे. पाचव्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर आहे, ज्याच्या स्मिथसोबतच निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

विराट कोहलीनंतर भारतीय खेळाडूंमध्ये चेतेश्वर पुजारा टॉप टेनमध्ये आहे. तो सहाव्या स्थानावर कायम आहे.