मुंबई : मुंबई उपनगरातील अक्सा चौपाटीवर ‘ब्लू बॉटल’ जेलीफिश या माशांच्या विषारी प्रजातीने 50 जणांना दंश केला आहे. याआधी गिरगाव चौपाटीवर या जेलीफिशने पाच जणांना दंश केला होता. सुट्टीचा दिवस असल्याने काल (4 ऑगस्ट) अक्सा चौपाटीवर नागरिकांनी मोठी गर्दी केली. त्यावेळी अनवाणी  पायांनी पाण्यात उतरलेल्या तब्बल 50 जणांना ब्लू बॉटल जेलीफिशने दंश केला. जेलीफिशच्या दंशानंतर तिथं उपस्थित असलेल्या जीवरक्षकांनी तातडीने अनेकांवर प्रथमोचार केले, तसंच त्यांना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं. प्रशासनाकडून आवाहन चौपाट्यांचा आनंद जरुर घ्या, पण त्यावेळी तुम्हाला थोडीशी काळजी घ्यावी लागेल. म्हणूनच प्रत्येक समुद्र किनाऱ्यावर याबाबत दक्षता घेण्याचं आवाहन करणारे माहिती फलक लावण्यात आले आहेत. अनवाणी पायाने समुद्रात न जाण्याचे आवाहनही प्रशासनाने केलं आहे. ब्लू बॉटल जेलीफिशची वैशिष्ट्ये समुद्राच्या लाटांसोबत हे जेलीफिश हेलकावे घेतात. छत्रीच्या आकाराचे असणारे हे जेलीफिश दिसायला आकर्षक असतात, मात्र यातल्या काही प्रजाती विषारी आहेत. मुंबईच्या समुद्रात साधारणत: तीन प्रकारचे जेलीफिश आढळतात. पावसाळ्याआधी ‘ब्लू बटन’ नावाचे जेलीफिश समुद्रकिनारी येतात, तर पावसाळ्यात ‘ब्लू बॉटल’ आणि पावसाळ्यानंतर ‘बॉक्स’ जेलीफिश किनाऱ्यावर येतात. यातील ब्लू बॉटल जेलीफिश विषारी असतात. ‘ब्लू बॉटल’ जेलीफिशचे शरीर दोन इंच आकाराचे निळ्या रंगाचे फुग्यासारखे असते, तसेच सात इंच दोरीसारखे पाय असतात. ‘ब्लू बॉटल’ जेलीफिशने डंख केल्यास त्या ठिकाणी लाल रंगाचे व्रण उठून गाठ येते आणि असह्य वेदनाही होतात.