फक्त शतक नव्हे.... तर IPLमध्ये विराटनं रचला आगळावेगळा इतिहास!
एबीपी माझा वेब टीम | 14 May 2016 04:57 PM (IST)
बंगळुरु: विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सनं चिन्नास्वामी स्टेडियम दणाणून सोडलं आणि अनेक विक्रमांनाही गवसणी घातली. आयीपएलमधलं विराटचं हे तिसरं शतक ठरलं असून एकाच मोसमात तीन शतकं ठोकणारा विराट हा पहिलाच फलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे विराटनं यंदाच्या मोसमातलं आपलं पहिलं शतकंही गुजरात लायन्सविरुद्ध ठोकलं होतं. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात विराटनं अकरा सामन्यांत 677 धावांचा रतीब घातला आहे. तसंच यंदाच्या मोसमात विराटनं सर्वाधिक 55 चौकार ठोकले आहेत. विराटनं यंदा अकरा सामन्यांत 25 षटकारही लागवले आहेत. बंगळुरूत विराटनं एबी डिव्हिलियर्ससह दुसऱ्या विकेटसाठी रचलेलली 229 धावांची भागीदारी ही ट्वेन्टी20 फॉरमॅटमधली सर्वोत्तम भागीदारी ठरली आहे. तसंच एकाच ट्वेन्टी20 सामन्यात दोन फलंदाजांनी शतकं साजरी करण्याची ही दुसरीच वेळ आहे. याआधी 2011 साली केविन ओब्रायन आणि हॅमिश मार्शलनं ग्लॉस्टरशायरकडून एकाच सामन्यात शतकं ठोकली होती.