मुंबई : आयपीएलच्या मैदानात यंदा फक्त विराट कोहलीचाच बोलबोला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपासून ते वासिम अक्रमपर्यंत सगळे दिग्गज विराटच्या खेळाचं कौतुक करताना थकत नाहीत.
15 सामन्यांत 919 धावा, 83.54 अशी जबरदस्त सरासरी, चार शतकं, सहा अर्धशतकं. कोहलीच्या याच विराट कामगिरीने रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरला आयपीएलच्या फायनलपर्यंत नेलं आहे.
काय आहे विराटच्या या यशाचं रहस्य?
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मते, विराट कधीहरी तंत्राशी तडजोड करत नाही, म्हणून तो इथवर पोहोचला आहे.
गल्फ न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सचिनने म्हटलं आहे की, "विराट नेहमी सरळ बॅटने खेळतो. त्याच्या भात्यात चांगले फटके आहेत. त्याची गुणवत्ता खास आहेच आणि तो खेळावर मेहनतही घेतो. विराटची शिस्त आणि संघाविषयी त्याची बांधिलकी इतरांनीही शिकण्यासारखी आहे. तो खेळाच्या वेगवेगळ्या फॉरमॅटमध्येही तंत्राला मुरड घालत नाही. विराट मानसिकदृष्ट्या कणखर आहे आणि दबावाखाली तो आणखी बहरतो."
सचिनच्या बोलण्यात किती तथ्य आहे, ते विराटची आकडेवारीच सांगते. विराटने यंदाच्या मोसमातील 15 सामन्यांमध्ये 78 चौकार आणि 36 षटकार ठोकले आहेत. त्याने एकूण 528 धावा या चौकार-षटकारांमध्ये जमा केल्या आहेत. म्हणजेच विराटने तब्बल 391 धावा या धावून काढल्या आहेत. टक्केवारीचा विचार केला तर विराटने 42.54 टक्के धावा या धावून काढल्या आहेत. त्याही ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये आयपीएलसारख्या स्पर्धेत.
विराटची धावांची भूक तर मोठी आहेच, शिवाय त्याने खेळात सातत्यही राखलं आहे. तो सहजासहजी आपली विकेट फेकत नाही. त्यामुळे विराटला गोलंदाजी करताना मीही चिंतेत पडलो असतो, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वसिम अक्रमने दिली आहे.