शिवसेनेच्या ‘शिववडा’ला भाजपच्या ‘नमो टी स्टॉल’ची टक्कर
एबीपी माझा वेब टीम | 27 May 2016 12:28 PM (IST)
मुंबई : शिवसेनेचा वडापाव आणि काँग्रेसच्या कांदेपोह्यांनंतर आता मुंबईकरांना भाजपच्या गरमागरम चहाची चव चाखता येणार आहे. मुंबईतील भाजपच्या नगरसेवकांनी ‘नमो टी स्टॉल’ची संकल्पना मांडली आहे. मुंबई महानगरपालिकेतील गटनेत्यांच्या बैठकीत भाजपने ‘नमो टी स्टॉल’चा प्रस्ताव मांडला असून, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी त्यांना टी स्टॉल चालवण्यास द्यावा, अशी संकल्पना भाजपची आहे. सुधार समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांना हा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत मांडला. नमो टी स्टॉल आणि नमो फूड्स स्टॉल अशा दोन मागण्या प्रस्तावाच्या माध्यमातून भाजपने मांडल्या आहेत. या प्रस्तावाला गटनेत्यांच्या बैठकीत तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, आधीच मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपमध्ये शाब्दिक रणकंदन सुरु आहे. त्यातच शिवसेनेच्या वडापावला टक्कर देण्यासाठी भाजप टी स्टॉल आणत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना-भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता नाकारता येत नाही.