हैदराबाद : भारताचा कर्णधार विराट कोहलीचा नवनव्या विक्रमांचा सिलसिला हैदराबाद कसोटीतही कायम राहिला. बांगलादेशविरुद्धच्या या कसोटीत विराटे ठोकलेलं द्विशतक हे त्याचं सलग चौथ्या मालिकेतलं चौथं द्विशतक ठरलं. अशी कामगिरी करणार विराट कोहली हा पहिलाच फलंदाज ठरला आहे.
या महापराक्रमासह भारतीय कर्णधाराने सर डॉन ब्रॅडमन आणि राहुल द्रविड यांचा सलग तीन कसोटी मालिकांमध्ये तीन द्विशतकांचा विक्रम मोडीत काढला.
विराटने वेस्ट इंडिज दौऱ्यातील अँटिगा कसोटीत, न्यूझीलंडविरुद्धच्या इंदूर कसोटीत, इंग्लंडविरुद्धच्या मुंबई कसोटीत आणि आता बांगलादेशविरुद्धच्या हैदराबाद कसोटीत द्विशतक झळकावलं. ही चार द्विशतकं त्याने सहा महिने आणि 19 दिवसांच्या कालावधीत ठोकली.
कोहली, साहाने दुसरा दिवस गाजवला, भारताचा पहिला डाव 687 धावांवर घोषित
बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत विराट कोहलीने 204 धावांची खेळी केली.
सर डॉन ब्रॅडमन यांनी 1930-31च्या मोसमात सलग तीन मालिकेत तीन द्विशतकं साजरी केली होती. 1930 मध्ये अॅशेस मालिकेत लीड्सवर ब्रॅडमन यांनी 232 धावा केल्या होत्या. यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत ब्रिस्बेनमध्ये 223 धावा ठोकल्या होत्या. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत 226 धावा करुन, सलग तीन मालिकेत तीन द्विशतक झळकावणारे पहिले फलंदाज बनले होते.
तर 'द वॉल' राहुल द्रविडने 2003-04 च्या मोसमात द्विशतकांची हॅटट्रिक केली होती. ऑक्टोबर 2003 मध्य अहमदाबादमधील न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत राहुल द्रविडने 222 धावा केल्या होता. यानंतर डिसेंबर 2003 मध्ये अॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 233 धावांची खेळी रचली होती. तर पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत 270 धावा करुन त्याने हॅटट्रिक साजरी केली.