मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.

विराटची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांमधली कामगिरी निराशाजनक ठरली आहे. या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये मिळून त्याच्या खात्यात फक्त 40 धावा जमा झाल्या आहेत. त्यामुळं 848 रेटिंग गुणांसह विराटची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ 936 गुणांसह आणि इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट 849 गुणांसह या क्रमवारीत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत.

बंगळुरू कसोटीत 92 धावांची धीरोदात्त खेळी करणाऱ्या चेतेश्वर पुजारानं अकराव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. अजिंक्य रहाणे पंधराव्या, तर लोकेश राहुल तेविसाव्या स्थानावर दाखल झाला आहे.