Virat Kohli IPL Record:  आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसरा सामना आज शेख झायेद स्टेडियमवर होत आहे. विराट कोहलीचा बंगळुरु आणि मॉर्गनच्या कोलकाता संघ भिडणार आहे.    बंगळुरु संघ त्यांच्या यूएईमधील अभियानाची सुरुवात कोलकाता विरुद्धच्या सामन्याने करणार आहे. या दोन संघातील हा दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना आहे.  


आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने यंदाच्या आयपीएलनंतर बंगळुरु संघांचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार म्हणून ही आयपीएल जिंकण्याचा प्रयत्न तो करणार आहे. मात्र आज त्याच्या नावावर एक विक्रम झाला आहे तर दुसरा एक विक्रम होण्याची शक्यता आहे.


कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध होणारा सामना हा विराट कोहलीच्या आयपीएल कारकिर्दीतील 200 वा सामना आहे. हा सामना खेळताच तो आयपीएल स्पर्धेत 200 सामने खेळणारा पाचवा खेळाडू ठरणार आहे. यापूर्वी असा कारनामा चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी, सुरेश रैना, मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि कोलकाताचा खेळाडू दिनेश कार्तिक याने केला आहे.


सोबतच या सामन्यात विराट कोहलीकडे टी-20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण करण्याची संधी असणार आहे. आज जर त्याने 71 धावा केल्या तर तो 10 हजार धावांचा पल्ला गाठेल.  विराट कोहलीपूर्वी हा विक्रम वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल, कायरन पोलार्ड, पाकिस्तानच्या शोएब मलिक आणि ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने केला आहे.


कुठे पाहाल सामना


 बंगळुरु आणि कोलकाता दरम्यान होणाऱ्या या सामन्याच्या प्रसारणाचे सर्वाधिकार स्टार इंडिया नेटवर्ककडे आहेत. त्यामुळं चाहते स्टार स्पोर्ट्स चॅनलवर हा सामना पाहू शकतील. विशेष म्हणजे स्टार इंडियाच्या चॅनल्सवरती आठ वेगवेगळ्या भाषांमध्ये आपण सामन्याचा आनंद घेऊ शकाल. मोबाईलवरही आपण हॉट स्‍टारच्या अॅपवर सामना पाहू शकाल. 
 
आरसीबीची प्लेइंग इलेव्हन : देवदत्त पडिक्कल, विराट कोहली (कर्णधार), रजत पाटिदार, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, शाहबाज अहमद , वानिंदू हसरंगा, काईल जेमीसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल.


केकेआर : इयॉन मॉर्गन (कर्णधार), गुरकीरत सिंह मान, करुण नायर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, शुभमन गिल, कुलदीप यादव,  एम. प्रसिद्ध कृष्णा,, टिम साउदी, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, शाकिब अल हसन, सुनील नारायण