अॅडलेड : विराट कोहलीनं अॅडलेडच्या वन डेत झळकावलेलं शतक टीम इंडियाच्या विजयात निर्णायक ठरलं. भारतीय कर्णधाराचं वन डे कारकीर्दीतलं हे 39 वं शतक ठरलं. तर ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर सर्व प्रकारातील विराटचं हे 11 वं शतक आहे.


ऑस्ट्रेलियात कोणत्याही खेळाडूला जमलं नाही ते विराटनं करुन दाखवलं आहे. ऑस्ट्रेलियात सर्वाधिक शतकं ठोकण्याचा कारनामा विराटनं करुन दाखवला आहे. विराटने ऑस्ट्रेलियात 11 शतकं ठोकल इंग्लंडच्या डेविड गॉवरचा विक्रम मोडला आहे.


डेविडने ऑस्टलियात 9 शतकं झळकावली होती. इंग्लंडच्याच जॅक हॉब्सनेही ऑस्ट्रेलियात 9 शतकं ठोकली आहे. तर वेस्ट इंडिजचा खेळाडू ब्रायन लाराने ऑस्ट्रेलियन भूमीवर 8 शतकं केली आहेत. सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, विव रिचर्ड्स यांनी प्रत्येकी 7-7 शतकं ठोकली आहेत.


याशिवाय विराट सर्वात कमी सामन्यांमध्ये 39 शतकं ठोकणारा फलंदाज ठरला आहे. विराटने 210 डावांमध्ये 39 शतकं झळकावली आहेत. तर सचिनने 39 शतकांचा पल्ला गाठण्यासाठी 350 डावांचा सामना करावा लागला होता.


टीम इंडियानं अॅडलेडच्या दुसऱ्या वन डेत ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाला विजयासाठी 299 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली या विजयाचा प्रमुख शिल्पकार ठरला. तर रोहित शर्मा, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या साथीनं टीम इंडियानं हा विजय साजरा केला.