इंदूर : इंदूर कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं द्विशतक साजरं केलं आहे. विराटनं 351 चेंडूंत दोनशे धावा पूर्ण केल्या.
विराटच्या या खेळीत अठरा चौकारांचा समावेश आहे. कर्णधार या नात्यानं कसोटीत दोन द्विशतकं झळकावणारा विराट कोहली हा पहिलाच भारतीय आहे.
टीम इंडियानं आतापर्यंत तीन गडी गमावून साडेचारशेच्या पार धावांची मजल मारली आहे. विराट कोहलीने द्विशतकी खेळी केली आहे, तर अजिंक्य रहाणेही द्विशतकाच्या दिशेने वाटचाल करत आहे. विराट आणि अजिंक्यनं चौथ्या विकेटसाठी 351 धावांची अभेद्य भागीदारी रचली.
कसोटीच्या दुसऱ्या दिवशी विराट कोहलीने शानदार शतक ठोकलं आणि अजिंक्य रहाणेच्या साथीने भारताच्या डावाला आकार दिला. कोहलीचं कसोटी कारकीर्दीतलं हे एकूण तेरावं आणि न्यूझीलंडविरुद्धचं तिसरं शतक ठरलं होतं.