मुंबई : भारतीय बॅडमिंटनपटूंनी रशिया ओपन ग्रांप्रीमध्ये दुहेरी यश संपादन केलं आहे. भारताच्या ऋत्विका शिवानी गड्डेनं महिला एकेरीचं विजेतेपद मिळवलं, तर प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डीनं मिश्र दुहेरीत बाजी मारली.
महिला एकेरीच्या फायनलमध्ये ऋत्विकानं रशियाच्या इवगेनिया कोसेत्सकायाचा 21-10, 21-13 असा सरळ गेम्समध्ये धुव्वा उडवला. ऋत्विकानं हा सामना अवघ्या 26 मिनिटांत जिंकला.
ऋत्विकाचं आपल्या कारकीर्दीतलं हे पहिलंवहिलं ग्रांप्री विजेतेपद ठरलं. मिश्र दुहेरीत भारताच्या चोप्रा-रेड्डी जोडीनं व्लादिमिर इवानोव्ह आणि वॅलेरिया सोरोकिना जोडीवर 21-17, 21-19 असा विजय मिळवला. दरम्यान भारताच्या सिरिल वर्माल पुरुष एकेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. मलेशियाच्या झुलफादली झुलकिफलीनं सिरिल वर्मावर 16-21, 21-19, 21-10 अशी मात केली.