सेन्चुरियन : अजिंक्य रहाणेचा संघात समावेश न केल्यामुळे टीका करणाऱ्यांवर कर्णधार विराट कोहलीने निशाणा साधला आहे. रहाणे संघातून बाहेर असावा असं अगोदर ज्यांना वाटत होतं, तेच आता रहाणे संघात नसल्यामुळे टीका करत असल्याचं विराट म्हणाला.


सेन्चुरियन कसोटीच्या पूर्वसंध्येला विराट कोहली बोलत होता. ''आठवड्यात किंवा पाच दिवसातच किती बदलू शकतं हे आश्चर्यकारक आहे. रहाणे अंतिम अकरा जणांमध्ये असावा, असं पहिल्या कसोटीपूर्वी कुणालाही वाटलं नव्हतं आणि आता इतर पर्यायांवर चर्चा करत आहेत'', असं म्हणत विराटने सल्ले देणाऱ्यांचा समाचारही घेतला.

दरम्यान, पहिल्या कसोटीपूर्वी रहाणेच्या निवडीबाबत विचारही केला नव्हता, असं विधानही विराटने केलं. रहाणेचं नाव अंतिम अकरामध्ये नसल्याने अनेक जाणकारांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. परदेश दौऱ्यांवरील रहाणेचा फॉर्म पाहता त्याला संधी मिळेल, अशी आशा होती. भारताला पहिल्या कसोटीत 72 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

''संघासाठी योग्य संतुलन साधणं आमच्यासाठी गरजेचं असतं. जर खेळाडू त्यामध्ये फिट बसत असेल, तर त्याला अंतिम अकरामध्ये घेण्यासाठी नक्कीच विचार केला जातो. आम्ही बाहेरच्या गोष्टींवर बिलकुल लक्ष देत नाही'', असंही विराटने स्पष्ट केलं.

रहाणे एक गुणवत्ता असलेला खेळाडू आहे. त्याची कामगिरी दक्षिण आफ्रिका आणि देशाबाहेर चांगली राहिलेली आहे. परदेश दौऱ्यांवर तो नक्कीच आमच्या मजबूत फलंदाजांच्या यादीत असतो, असंही सांगायला विराट विसरला नाही.

दरम्यान, सध्याच्या परिस्थितीमध्ये रहाणेपेक्षा रोहित शर्माला संधी देणं का गरजेचं आहे, ते पुन्हा एकदा विराट कोहलीने सांगितलं.