नवी दिल्ली : क्रीडा क्षेत्रातल्या सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या 'राजीव गांधी खेलरत्न' पुरस्कारासाठी बीसीसीआयने क्रिकेटपटू विराट कोहलीच्या नावाची शिफारस केली आहे. तर अर्जुन पुरस्कारासाठी तडाखेबाज फलंदाज अजिंक्य रहाणेचं नाव पुढे करण्यात आलं आहे.
कसोटी कर्णधार म्हणून धोनीच्या जागी विराटची नियुक्ती करण्यात आली. विराटच्या नेतृत्वात श्रीलंकेत टीम इंडियाने विजयश्री मिळवला. त्याचप्रमाणे कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या बलाढ्य दक्षिण आफ्रिकेलाही घरच्या मैदानात 3-0 ने धूळ चारली. 2014 आणि 2016 च्या टी 20 विश्वचषकात मालिकावीर होण्याचा मान विराटला मिळाला होता.
कोहली आणि रहाणेच्या नावाची शिफारस बीसीसीआयकडून करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांची नावं पुरस्कार निवड समितीकडे पाठवण्यात येतील, अशी माहिती क्रीडा मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
विराटचा खेलरत्नने सन्मान झाल्यास सचिन तेंडुलकर (1997-98) आणि एम एस धोनी (2007-08) नंतर तो खेलरत्न पटकवणारा तिसराच क्रिकेटपटू ठरणार आहे. दुसरीकडे, मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या नावाची शिफारस अर्जुन पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.
रहाणे आणि कोहलीशिवाय नेमबाज जितू राय, गोल्फपटू अनिर्बन लाहिरी, स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकल आणि अॅथलेट टिंटू यांच्या नावाचीही खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. खेलरत्न पुरस्काराची रक्कम साडेसात लाख रुपये, तर अर्जुन पुरस्काराची रक्कम 5 लाख रुपये इतकी आहे.