सेन्च्युरियन : विराट कोहलीनं सेन्च्युरियन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी एक फलंदाज आणि कर्णधार या नात्याने अतिशय आदर्श फलंदाजी केली. एका क्षणी तर त्याच्यातला आदर्श पतीही दिसून आला.
विराट कोहलीनं सेन्च्युरियन कसोटीत कारकीर्दीतलं एकविसावं शतक साजरं केलं. भारतीय कर्णधाराच्या या शतकाचं मोल जितकं विराट आहे, तितकंच त्याचं सेलिब्रेशनही विराट झालं. पण आनंदाच्या त्या अत्युच्च क्षणीही विराटला दिसली ती दुसरी धाव. पुढच्याच क्षणी शतकाचं सेलिब्रेशन आवरतं घेऊन, त्यानं अधाशासारखी दुसरी धाव वसूल केली. त्याक्षणी विराटच्या पायात आणि त्याच्या स्ट्राईड्समध्ये जणू उसेन बोल्ट नावाची वीज संचारल्यासारखी दिसली. ती धाव झाली आणि मग पुन्हा पाहायला मिळालं ते विराट सेलिब्रेशन पार्ट टू.
विराट सेलिब्रेशन पार्ट थ्री तर खासच होता. टीम इंडियाच्या कर्णधारानं दीडशे धावांचा टप्पा ओलांडता क्षणी, आपल्या गळ्यातली साखळी बाहेर काढून त्यात ओवलेल्या अंगठीचं चुंबन घेतलं. ती अंगठी अर्थातच अनुष्का शर्मानं लग्नात त्याच्या बोटात घातली होती. क्रिकेटच्या मैदानात अंगठी बोटांत घालणं शक्य नसल्यानं विराटनं ती अंगठी गळ्यात साखळीत ओवून घेतली आहे.
सेन्च्युरियनच्या मैदानात विराटमधला परफेक्ट हजबंड दिसण्याआधी त्याच्यामधल्या फलंदाजांचा एक वेगळा अवतार पाहायला मिळाला.
विराट कोहलीनं २१७ चेंडूंमधल्या १५३ धावांच्या या खेळीला पंधरा चौकारांचा साज चढवला. दक्षिण आफ्रिकेत कसोटी शतक ठोकणारा तो सचिन तेंडुलकरनंतरचा दुसरा भारतीय कर्णधार ठरला. पण विराटची ही लढाई इतकी एकाकी होती, की भारताच्या डावात दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ही ४६ धावांची होती. त्यामुळंच कर्णधार या नात्यानं भारताच्या डावात विराटचं मॅरेथॉन शतक खूपच मोलाचं ठरलं.
विराट कोहलीनं एक कर्णधार आणि एक फलंदाज या दोन्ही नात्यांमधून सेन्च्युरियनवर आपली भूमिका चोख बजावली. आता ही कसोटी टीम इंडियाच्या बाजूनं झुकवायची, तर इतरांनाही आपला रोल बजावावा लागणार आहे.
संबंधित बातम्या :
विराटचं शतक, पण टीम इंडिया बॅकफूटवरच
विराटमुळे भारताच्या पहिल्या डावाला आकार