मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि क्रिकेटपटू जसप्रीत बुमरा यांनी आयसीसीच्या वन डे फलंदाज आणि गोलंदाजांच्या क्रमवारीत अनुक्रमे नंबर वन स्थान मिळवलं आहे. मात्र संघाच्या क्रमवारीत टीम इंडिया नंबर वनपासून केवळ पाच रेटिंग गुणांनीच दूर आहे.

आगामी आठ वन डे सामन्यांमध्ये ओळीने विजय मिळवला, तर टीम इंडियाला आयसीसी क्रमवारीत नंबर वनच्या उंबरठ्यावर दाखल होणं शक्य आहे. या क्रमवारीत सध्या इंग्लंड 126 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाच्या खात्यात 121 गुण आहेत. ऑस्ट्रेलियात तीन आणि न्यूझीलंडमध्ये पाच असे आठ वन डे सामने ओळीने जिंकल्यास भारताच्या खात्यात 125 गुण होतील. न्यूझीलंड 113 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.

बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत 21 विकेट्स मिळवत बुमराहने पहिल्या स्थानावर मुसंडी मारली. बुमराहच्या खात्यात 841 गुण जमा आहेत. बुमराहच्या आसपास एकही गोलंदाज नाही. दुसऱ्या क्रमांकावर असलेला अफगाणिस्तानचा राशिद खान थेट 788 गुणांवर आहे. तर भारताचा डावखुरा स्पिनर कुलदीप यादव 723 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. युजवेंद्र चहल 683 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे.

आयसीसी फलंदाजांच्या यादीत कोहली 899 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर वनडेचा उपकर्णधार रोहित शर्मा 871 गुण मिळवत दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडच्या रॉस टेलरने या यादीत तिसरं स्थान मिळवलं आहे.