नवी दिल्ली :  येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात आघाडीचा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रसने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.


भाजपाला आव्हान देण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन मोट बांधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग आज राजधानी दिल्लीमध्ये पाहायला मिळाला. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.


एएनआयच्या वृत्तानुसार, संध्याकाळच्या सुमारास दोघांची भेट झाली. दिल्लीतील शरद पवारांच्या 6 जनपथ या निवासस्थानी ही भेट झाली.  यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे हे देखील उपस्थित होते. तर राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. या भेटीचा तपशील अद्याप मिळालेला नाही पण शरद पवारांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे. राहुल गांधींसोबत चांगली चर्चा झाली, आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काय रणनिती असावी याबाबत राहुल गांधींशी चर्चा झाली, असे ट्विट पवारांनी केलं आहे.


महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीतलं जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे. आता आठ जागांचा पेच बाकी आहे. पवार आणि राहुल गांधींच्या बैठकीत आठपैकी पाच जागांवर तोडगा निघाला असून 3 जागांचा निर्णय बाकी असल्याची माहिती आहे.