हैदराबाद : टीम इंडियाचा डॅशिंग कर्णधार विराट कोहलीने बांगालदेशविरुद्धच्या एकमेव कसोटीत धडाकेबाज द्विशतक ठोकलं. कोहलीने 239 चेंडूत 24 चौकार ठोकत द्विशतक झळकावलं. पण एक मोठा फटका खेळण्याच्या नादात तो 204 धावा करुन माघारी परतला. कोहलीचं हे चौथं द्विशतक आहे. यापूर्वी त्याने वेस्ट इंडिज (200), न्यूझीलंड (211) आणि इंग्लंड (235) विरुद्ध द्विशतकं झळकावली आहेत. महत्त्वाचं म्हणजे कोहलीची चारही द्विशतकं 2016-17 या एकाच वर्षातील आहेत. दरम्यान, कालच्या 3 बाद 356 धावांवरुन कोहली आणि अजिंक्य रहाणे दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. कोहलीने  दीडशतक तर रहाणेने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. या दोघांनी मग धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र तैजूम इस्लामच्या गोलंदाजीवर मेहदी हसनने अजिंक्य रहाणेचा अप्रतिम झेल टिपला. रहाणे 82 धावांवर बाद झाला. त्यानंतर मग कोहलीच्या साथीला रिद्धीमान साहा आला. साहाच्या साथीने कोहलीने झटपट आपलं द्विशतक पूर्ण केलं. मात्र त्यानंतर तो लगेचच बाद झाला. कोहली बाद झाला, त्यावेळी भारताची धावसंख्या 5 बाद 495 अशी होती. पहिल्या दिवसाचा खेळ मुरली विजय आणि कर्णधार विराट कोहलीनं झळकावलेल्या शतकांनी हैदराबाद कसोटीत भारताला पहिल्या दिवसअखेर तीन बाद 356 धावांची मजल मारून दिली. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी कोहली 111 धावांवर, तर अजिंक्य रहाणे 45 धावांवर खेळत होता. सलामीच्या लोकेश राहुलचा अपवाद वगळता भारतीय फलंदाजांनी काल धावांच्या गंगेत आपले हात धुवून घेतले. त्यामुळं भारताच्या डावात मोठ्या भागिदारी पाहायला मिळाल्या. मुरली विजयनं चेतेश्वर पुजाराच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 178 धावांची, तर विराट कोहलीच्या साथीनं तिसऱ्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली. मग विराटनं अजिंक्य रहाणेच्या साथीनं चौथ्या विकेटसाठी 122 धावांची अभेद्य भागीदारी रचली. भारताकडून चेतेश्वर पुजारानं नऊ चौकारांसह 83 धावांची, तर मुरली विजयनं 12 चौकार आणि एका षटकारासह 108 धावांची खेळी उभारली. त्याचं हे नववं कसोटी शतक ठरलं. विराट कोहलीनं कारकीर्दीतलं सोळावं कसोटी शतक साजरं केलं. त्याच्या नाबाद 111 धावांच्या खेळीला बारा चौकारांचा साज आहे. अजिंक्य रहाणे सात चौकारांसह नाबाद 45 धावांची खेळी केली.