मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या यशाच्या शिखरावर आहे. दरदिवशी तो अनेक विक्रम पादाक्रांत करत आहे. त्याच्या नेतृत्त्वात भारताने ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत पराभूत केलं. तर कसोटी रँकिंगमध्ये अव्वल स्थान आणखी भक्कम केल्याबद्दल भारताला गदा देण्याता आली. गुरुवारी विराटला 'पद्मश्री'ने गौरवण्यात आलं. आता विराट कोहलीची दिवसाची कमाई पाच कोटींच्या घरात पोहोचली आहे.


एका दिवसाचे 5 कोटी रुपये!
विराट कोहली सध्या अनेक टीव्ही जाहिरातींमध्ये झळकतो, त्यामुळे त्याची फीदेखील वाढली आहे. विराट कोहलीची एका दिवसाची कमाई आता 5 कोटी रुपये झाली आहे. कोणत्याही सेलिब्रिटीला एका दिवसाला मिळणाऱ्या फीमध्ये ही सर्वाधिक आहे. 28 वर्षीय कोहली आता देशातील सर्वात मोठा ब्रॅण्ड प्रमोटर झाला असून, जगातील सर्वात महागड्या सेलिब्रिटीमध्येही त्याचा समावेश झाला आहे.

फीमध्ये दुप्पट वाढ
मागील वर्षापर्यंत विराट कोहलीची फी सुमारे निम्मी होती. तो एका दिवसाला सुमारे 2.5 ते 3 कोटी रुपयांची कमाई करत होता. पण एप्रिल महिन्यापासून विराट कोहली फी वाढवण्याच्या तयारीत आहे. वाढलेल्या फीसह विराट कोहली पेप्सिकोसोबत पहिला करार करेल.

कंपनीकडून वृत्ताचा इन्कार
मात्र विराट कोहलीच्या जाहिरात आणि इतर व्यवहार करणारी कंपनी कॉर्नरस्टो स्पोर्टने या वृत्ताचा इन्कार केला आहे. पेप्सिकोसोबत कोहलीच्या कराराबाबत चर्चा सुरु असल्याचं कंपनीतर्फे सांगण्यात आलं.

पुमासोबत करार
विराट कोहलीने नुकताच स्पोर्ट्स कंपनी पुमासह मोठ्या रकमेचा करार केला होता. त्याने पुमासोबत 8 वर्षांसाठी 110 कोटींचा करार केला होता.

याशिवाय विराट कोहली ऑडी लक्झरी कार, एमआरएफ टायर, टिसॉट वॉच, जिओनी फोन, बूस्ट मिल्क ड्रिंक, कोलगेट टूथपेस्ट यांसारख्या उत्पादनांचीही जाहिरात करतो.