मुंबई : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी मुलाखती घेण्यात आल्या. मात्र कर्णधार विराट कोहली भारतात आल्यानंतर त्याच्याशी आणि बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य सौरव गांगुली यांनी दिली.


विराट कोहलीच्या म्हणण्यानुसारच टीम इंडियाचा प्रशिक्षक निवडण्यात येईल. मात्र क्रिकेट सल्लागार समिती त्याच्यासमोर केवळ दोनच नावांचा पर्याय ठेवणार आहे. यामध्ये वीरेंद्र सेहवाग आणि ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू टॉम मूडी यांची नावं आहेत, अशी माहिती बीसीसीआयमधील सूत्रांनी दिली आहे.

अर्थातच रवी शास्त्री यांचं नाव निश्चित मानलं जात असलं तर बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारवर त्यांचं नाव स्पर्धेत नाही, असं म्हणावं लागेल. विराट कोहली आणि रवी शास्त्री यांचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे रवी शास्त्री यांचीच टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी वर्णी लागेल, असा अंदाज लावला जात होता. मात्र विराटसमोर रवी शास्त्री यांच्या नावाचा पर्यायच नसेल, अशी माहिती आहे.

टीम इंडियाचे माजी संचालक रवी शास्त्री, टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सहवाग, इंग्लंडचे क्रिकेटर रिचर्ड पायबस, वेस्ट इंडिजचे फिल सिमन्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आणि श्रीलंकेचे माजी कोच टॉम मुडी आणि सध्याचे अफगाणिस्तान क्रिकेट टीमचे कोच लालचंद राजपूत यांनी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता.