आयसीसी कसोटी क्रमावारीत विराटचं एक पाऊल पुढे
एबीपी माझा वेब टीम | 13 Dec 2016 10:54 PM (IST)
नवी दिल्ली : भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीने कसोटी फलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत एक पाऊल आणखी पुढे टाकलं आहे. मुंबई कसोटीत द्विशतक ठोकून विराटच्या खात्यात आणखी 53 गुणांची भर पडली आहे. विराटच्या याच द्विशतकाने भारताच्या इंग्लंडवरच्या दणदणीत विजयात मोलाची भूमिका बजावली होती. या कामगिरीने विराटच्या खात्यात 53 गुणांची भर घातली आहे. त्यामुळे कसोटी फलंदाजांच्या आयसीसी क्रमवारीत तो 886 गुणांसह तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर दाखल झाला आहे. वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमधल्या कामगिरीसाठीच्या आयसीसी क्रमवारीत विराट अनुक्रमे दुसऱ्या आणि पहिल्या स्थानावर आहे. त्यामुळे विराटला आता एकाच वेळी तिन्ही फॉरमॅट्सच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान होण्याची संधी आहे.