अँटिगा: अँटिगा कसोटीवर टीम इंडियानं आपली पकड आणखी मजबूत बनवली आहे. विराटचं द्विशतक आणि अश्विनच्या शतकाच्या जोरावर भारतानं पहिला डाव आठ बाद 566 धावांवर घोषित केला. तर दुसऱ्या दिवसअखेर वेस्ट इंडिजला एक बाद 31 धावांची मजल मारता आली आहे.
भारतीय क्रिकेटच्या 84 वर्षांच्या इतिहासात विराट कोहलीनं रचला नवा विक्रम. परदेशात द्विशतक ठोकणारा विराट कोहली हा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला. विजय हजारे, मन्सूर अली खान पतौडी, अजित वाडेकर, सुनील गावस्कर, कपिलदेव, दिलीप वेंगसरकर, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांसारख्या रथीमहारथी कर्णधारांनाही आजवर अशी कामगिरी करता आलेली नाही. पण विराटनं अँटिगा कसोटीच्या दुसऱ्या दिवशी द्विशतक करुन आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.
विराटनं 283 चेंडूंत 200 धावांची खेळी 24 चौकारांनी सजवली. विराटचं कसोटी कारकीर्दीतलं हे पहिलंच द्विशतक ठरलं.
कोहलीच्या या विराट खेळीनंतर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी टाळ्या वाजवून दाद दिली. तर भारताचा मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे कोहलीनं द्विशतक ठोकलं, तो क्षण कॅमेऱ्यात कैद करताना दिसला.
कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा विराट कोहली हा आजवरचा पाचवा भारतीय कर्णधार ठरला. याआधी मन्सूर अली खान पतौडी, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि धोनीनं कर्णधार या नात्यानं कसोटीत द्विशतक झळकावलं होतं. पण ही सर्व द्विशतकं भारतात ठोकली होती. अँटिगात द्विशतक करुन विराटनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बारा हजार धावांचाही टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा विराट कोहली हा आठवा भारतीय खेळाडू ठरला.
गेल्या काही वर्षांत विराटनं भारतात आणि भारताबाहेरही भरीव कामगिरी बजावली आहे. मग ऑस्ट्रेलिया असो किंवा दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड असो वा श्रीलंका देशात आणि परदेशातही विराटनं आपलं नाणं खणखणीत असल्याचं दाखवून दिलं आहे.
अँटिगा कसोटीत विराटनं कर्णधार आणि एक फलंदाज म्हणून आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. विराटनं शिखर धवनच्या साथीनं 105, रहाणेच्या साथीनं 57 आणि अश्विनच्या साथीनं 168 धावांची भागीदारी रचून टीम इंडियाला कसोटीवर आपली पकड आणखी मजबूत करुन दिली.
अँटिगाच्या खेळपट्टीवर विराटसह रवीचंद्रन अश्विननंही धावत्या गंगेत आपले हात धुवून घेतले. आणि कसोटी कारकीर्दीतलं आपलं तिसरं शतक साजरं केलं.